Corona Vaccination Pune : पुणे शहरातील सर्व लसीकरण केंद्र शनिवारीही राहणार बंदच; लवकरच मार्ग निघेल, महापौरांचा विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2021 09:36 PM2021-05-21T21:36:40+5:302021-05-21T21:36:51+5:30
‘सिरम’चीही पुण्याला लस देण्याची तयारी आहे. मात्र, त्यासाठी काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत.
पुणे: राज्य सरकारकडूनपुणे महापालिकेला शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत कोरोना लसींचा पुरवठा न झाल्यामुळे शनिवारी देखील (दि. २२) शहरातील सर्व लसीकरण केंद्र बंद राहणार असल्याची माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.
राज्य सरकारकडून पुणे महानगरपालिकेला प्रतिबंधक लसींचा पुरवठा करण्यात येत आहे. मात्र, शहरात धडाक्यात कोरोना लसीकरण सुरु असतानाच गेल्या काही दिवसांपासून लसींचा पुरवठा करण्यात अडचण येत आहे. त्यामुळे मागील आठवड्यापासून पुणेकरांच्या लसीकरणाची मोहीम रखडली आहे.
गेल्या शनिवारपासून तीन दिवस पुणे शहरातील लसीकरण बंद होते. मात्र मंगळवारी रात्री राज्य सरकारकडून काही प्रमाणात लसी प्राप्त झाल्यानंतर बुधवारी शहरातील ठराविक केंद्रांवर लसीकरण सुरू करण्यात आले होते. मात्र गुरुवारी रात्री उशिरापर्यंत लसींचा पुरवठा प्राप्त न झाल्याने शुक्रवारी(दि.२१) पुन्हा एकदा पुणे मनपा हद्दीतील सर्व कोरोना लसीकरण केंद्रे बंदच होते. सरकारकडून शुक्रवारी तरी पुणे महापालिकेला काही लसींचा लसी प्राप्त होतील अशी शक्यता वर्तविण्यात येत होती.परंतू, लसी मिळाल्या नाही त्यामुळे शनिवारी सुद्धा पुणे शहरातील लसीकरण केंद्र बंद ठरवण्याची वेळ महापालिका प्रशासनावर आली आहे.
महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, सिरम इन्स्टिट्यूट’कडे लस मिळविण्यासाठी गेली दोन आठवडे मी स्वतः बैठका घेऊन पाठपुरावा करत आहे. ‘सिरम’चीही पुण्याला लस देण्याची तयारी आहे. मात्र, त्यासाठी काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्या अडचणी दूर करण्यासाठी केंद्र, राज्य सरकारशीही माझा पत्रव्यवहार सुरु आहे. यावर लवकर मार्ग निघेल, हा विश्वास वाटतो. पुणेकरांना शक्य तितक्या कमी वेळात अधिकाधिक लसीकरण करण्यासाठी कसोशिने प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी ‘सिरम इन्स्टिट्यूट’मध्ये प्रत्यक्ष जाऊन चर्चाही केलेली आहे.
लसीकरण केंद्र सुरु झाल्यावर यांना मिळणार प्राधान्य...
लसीकरण केंद्रांवर लस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांमध्ये प्रथम दिव्यांग नागरिक, दुसऱ्या डोसचे लाभार्थी, ज्येष्ठ नागरिक व त्यानंतर ऑनलाईन नोंदणी केलेले पहिल्या डोसचे लाभार्थी यांना प्राधान्य दिले जाणार आहे. त्यानंतर ऑनस्पॉट नोंदणीसाठी आलेल्या पहिल्या डोसच्या लाभार्थ्यांना लस दिली जाणार आहे.