Corona Vaccination Pune : पुणे महापालिकेच्या ३९ केंद्रांवर कोविशिल्ड तर १५ केंद्रांवर कोव्हॅक्सिन बुधवारी उपलब्ध राहणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2021 10:16 PM2021-06-15T22:16:24+5:302021-06-15T22:16:48+5:30
१८ वर्षांवरील सर्व दिव्यांग नागरिकांसाठी बुधवारी विशेष 'मोहीम'
पुणे : महापालिकेच्या ३९ केंद्रांवर कोव्हिशिल्ड लस उपलब्ध राहणार आहे. तर १५ केंद्रांवर कोव्हॅक्सिन लस उपलब्ध असणार आहे. यासोबतच १८ वर्षांवरील सर्व दिव्यांग नागरिकांसाठी बुधवारी विशेष मोहीम घेतली जाणार आहे. त्यांच्यासाठी १५ केंद्रांवर लसीकरण नियोजित करण्यात आले आहे.
पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेल्या १०० डोस पैकी ४० टक्के कोव्हिशिल्ड लस व ६० टक्के कोव्हॅक्सिन लस या आॅनलाईन अपॉईमेंट /स्लॉट बुक केलेल्या ४५ वर्षांपुढील नागरिकांना पहिला डोस म्हणून दिल्या जाणार आहेत.
लसीकरणाकरिता बुकिंग करण्यासाठी बुधवारी सकाळी ८ वाजता ऑनलाईन स्लॉट ओपन होणार आहे. कोव्हिशिल्ड लसीच्या साठ्यापैकी ४० टक्के लस ज्या नागरिकांनी ८४ दिवसांपूर्वी (२४ मार्च पूर्वी ) पहिला डोस घेतला आहे, त्यांना दुसरा डोस दिला जाणार आहे. तसेच उर्वरित २० टक्के लस ही हेल्थ वर्कर, फ्रंट लाईन वर्कर व ४५ वर्षे वयावरील नागरिकांना आॅन दी स्पॉट नोंदणी करून पहिला डोस म्हणून दिली जाणार आहे़
-----
१८ मे पूर्वी डोस घेतलेल्याना कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस
ज्या नागरिकांनी १८ मे पूर्वी कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेतला आहे, अशा नागरिकांना बुधवारी १५ केंद्रांवर दुसरा डोस उपलब्ध राहणार आहे. यातील ६० टक्के लस ही आॅनलाईन नोंदणी केलेल्यांना व ४० टक्के लस ही आॅनस्पॉट नोंदणी केलेल्यांना दिली जाणार आहे. कोव्हॅक्सिनचा पहिला डोस मात्र कोणालाही दिला जाणार नाही.
-----
१८ वर्षांवरील सर्व दिव्यांग नागरिकांसाठी बुधवारी विशेष 'ड्राईव्ह'
पालिका हद्दीतील १८ वर्षांवरील सर्व दिव्यांग नागरिकांसाठी बुधवारी १५ केंद्रांवर प्रत्येकी १०० कोविशील्ड लस उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. ऑन स्पॉट नोंदणी करुन डोस देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी राज्य किंवा केंद्र शासन प्रमाणित दिव्यांग प्रमाणपत्र आवश्यक असून सोबत शासकीय ओळखपत्रही आवश्यक आहे.