Corona Vaccination Pune : पुण्यात उद्या फक्त १५ लसीकरण केंद्रांवर सुरु राहणार; कोव्हॅक्सिन लसींचा दुसरा डोस दिला जाणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 10:44 PM2021-05-31T22:44:51+5:302021-05-31T22:46:48+5:30
पुण्यात उद्या फक्त १५ लसीकरण केंद्रांवर सुरु राहणार; कोव्हॅक्सिन लसींचा दुसरा दिला जाणार
पुणे: पुणे शहरात मंगळवारी (दि.१) फक्त कोव्हॅक्सिन लस दिली जाणार आहे. शहरातील १५ केंद्र सुरू राहणार असून प्रत्येकी १०० डोस उपलब्ध असणार आहे. त्यात ही कोव्हॅक्सिनचा पहिला डोस दिला जाणार नसून ४ मे पूर्वी कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेणाऱ्या नागरिकांनाच उद्या दुसरा डोस दिला जाणार आहे. अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.
पुणे शहरातील क्षेत्रीय कार्यालयनिहाय महापालिकेच्या केंद्रांवर या कोव्हॅक्सिन लसींचे प्रत्येकी १०० डोस वितरित केले जाणार आहे. दरम्यान, सोमवारीही राज्य सरकारकडून कोविशिल्ड लसींचा पुरवठा उपलब्ध झाला नाही. त्यामुळे नागरिकांना मंगळवारी ही लस दिली जाणार नाही.
देशात सर्वच ठिकाणी कोविशिल्ड आणि या लस देण्यात येत आहे.मात्र, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह राज्यासह इतर राज्यातही कोरोना प्रतिबंधक लसींचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवत आहे. त्याचा परिणाम शहरीसह ग्रामीण भागातील लसीकरण मोहिमेवर होत आहे. जून महिन्यात लसीकरण मोहिमेचे उत्पादन वाढणार असून वितरण सुरळीत होणार असल्याची माहिती आहे.
परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे शहरात आजपासून लसीकरण सुरू
पुणे शहरातून शिक्षणासाठी परदेशात जात असलेल्या विद्यार्थ्यांचे, मंगळवारी (दि. १ जून) लसीकरण सुरू करण्यात आले आहे. महापालिकेच्या कमला नेहरू रूग्णालयातील ५ व्या मजल्यावरील लसीकरण केंद्रांवर विद्यार्थ्यांना कोव्हिशिल्ड लसीचा पहिला डोस दिला जाणार आहे.