Corona Vaccination: पुणे जिल्ह्यात रेकॉर्डब्रेक अडीच लाख! मेगा लसीकरणाला भरघोस प्रतिसाद
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2021 12:24 AM2021-09-01T00:24:58+5:302021-09-01T00:26:01+5:30
जिल्ह्यात कोरोनाची तिसरी लाट थोपवण्यासाठी तसेच लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी खासगी कंपन्यांनी त्यांच्या सामाजिक दायित्व निधीतून लस उपलब्ध करून देण्याचे आवाहन करण्यात आले होते.
पुणे : एकाच दिवसात अडीच लाख नागरिकांचे लसीकरण करत जिल्ह्याने मंगळवारी (दि.३१) राज्यात लसीकरणाचा स्वत:चाच कीर्तीमान मोडत नवा कीर्तीमान प्रस्थापित केला. बजाज समुहाने दिलेले दीड लाख डोस आणि शासनाकडे उपलब्ध असलेल्या लसी यातून राबविण्यात आलेल्या मेगा लसीकरण कार्यक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने ५५९ लसीकरण केंद्रावर लसीकरणाची व्यवस्था केली होती. आतापर्यंत जिल्ह्याला ८० लाख ३१ हजार लसींचे डोस मिळाले.
जिल्ह्यात कोरोनाची तिसरी लाट थोपवण्यासाठी तसेच लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी खासगी कंपन्यांनी त्यांच्या सामाजिक दायित्व निधीतून लस उपलब्ध करून देण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला बजाज समुहाने सकारात्मक प्रतिसाद देत दीड लाख कोविशिल्डच्या लस दिल्या. तर शासनाच्या ६० हजार लसींचे डोस यातून मंगळवारी (दि.३१) मेगा लसीकरण मोहीम राबविण्यात आली.
ग्रामीण भागातील ५५९ केंद्रावर दीड लाख नागरिकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. तर पुणे आणि पिंपरी मिळून दोन लाखापर्यंत लसीकरणाचे उद्दिष्ट प्रशासनाचे होते. मेगा लसीकरण मोहिमेसाठी जिल्हा परिषदेने जंगी तयारी केली होती. जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, उपाध्यक्ष रणजित शिवतरे, आरोग्य सभापती प्रमोद काकडे तसेच सर्व सदस्यांनी, सरपंच, ग्रामसेवक, सदस्यांनी जास्तीत जास्त लसीकरण करण्यासाठी नागरिकांना आवाहन केले होते. त्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रात्री ९ वाजेपर्यंत लसीकरण सुरू होते.
ग्रामीण भागात १३ तालुक्यात १ लाख ७७ हजार ३२५ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. तर पुणे आणि पिंपरीत ६६ हजार ३९७ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. यात १ लाख ८९ हजार ४७२ जणांनी पहिला डोस घेतला. तर ४८ हजार ५९० नागरिकांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत मोजक्याच दिवशी लाखाहून अधिक लसीकरण झाले आहे. एप्रिल महिन्याच्या ५ तारखेला ८५ हजार १४६ जणांचे लसीकरण करण्यात आले होते. २६ जूनला १ लाख २९ हजार ९२३ लसीकरण झाले होते. २६ जूनला १ लाख १५ हजार ९४३, २८ जूनला १ लाख ४ हजार १४४, ३ जुलै १ लाख ४ हजार २४९, १० जुलैला १ लाख १९ हजार ७०६, १४ ऑगस्टला १ लाख ८३५ हजार, २१ ऑगस्टला १ लाख २ हजार २७४, तर २६ ऑगस्टला १ लाख १५ जणांचे लसीकरण झाले.
कोरोनाची साथ पूर्णपणे नियंत्रणात येण्यासाठी लसीकरण हाच सध्याचा एकमेव मार्ग आहे. जिल्ह्यात १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. १ मार्चपासून सामान्य नागरिकांसाठी लसीकरण खुले करण्यात आले. एप्रिल महिन्यात दोनदा, जून महिन्यात तीनदा, जुलै महिन्यात दोनदा, तर ऑगस्ट महिन्यात तीनदा एक लाखांहून अधिक लसीकरण झाले आहे. जिल्ह्याला सध्या एका महिन्याला १०-१५ लाख लसींचा पुरवठा होत आहे. त्यामुळे दररोज जास्तीत जास्त ५० हजार लसीकरण करणे शक्य होत आहेत. मंगळवारी एकाच दिवसांत अडीच लाख नागरिकांचे लसीकरण झाल्याने नवा कीर्तीमान पुणे जिल्ह्याने प्रस्तापित केला आहे.
जिल्ह्यात अडीच लाखांच्या आसपास लसीकरण करण्यात आले. आतापर्यंतचे एकाच दिवसांत झालेले हे सर्वाधिक लसीकरण आहे. लसींचा असाच पुरवठा झाला तर येत्या काही दिवसांतच उरलेल्या सर्वांचे लसीकरण करता येणार आहे. सामाजिकदायित्व निधीतून आणि शासनाकडून जास्तीत जास्त लस मिळवण्याचा आमचा प्रयत्न आहे. - निर्मला पानसरे, अध्यक्षा, जिल्हा परिषद
मेगा लसीकरण मोहिमेसाठी बजाज कंपनीतर्फे आणि शासनाकडून मिळालेल्या लसींमधून मेगा लसीकरण मोहीम राबविण्यात आली. यासाठी सर्व तालुक्यांना लाभार्थ्यांच्या हिशोबाने लस पुरवठा करण्यात आला. सकाळपासून नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. केंद्रांनीही लसीकरणाचे चांगले नियोजन केल्याने जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण आज होऊ शकले. -आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी