Corona Vaccination : पुण्यात देहविक्रय करणाऱ्या महिलांचे लसीकरण सुरु; महापालिकेकडून लसींचा पुरवठा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2021 08:51 PM2021-07-09T20:51:51+5:302021-07-09T23:50:46+5:30
विधान परिषद उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी केली सूचना
पुणे : शहराच्या मध्यवस्तीमधील बुधवार पेठेमधील देहविक्रय करणाऱ्या महिलांसाठी पालिकेकडून लसीकरण सुरु करण्यात आले आहे. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी या महिलांशी संवाद साधल्यानंतर पालिका प्रशासनाला याबाबत सूचना केली होती. त्यानंतर, पालिकेने तात्काळ लस उपलब्ध करुन देत लसीकरण सुरु केले.
पालिकेकडून हकमचंद नथूभाई गुजराथी शाळेमध्ये हे लसीकरण सुरु केले आहे. बुधवार पेठेतील देहविक्रय करणाऱ्या महिलांची संख्या आजमितीस साडेतीन हजारांपेक्षा अधिक आहे. या महिलांचा दररोज शेकडो नागरिकांसोबत संपर्क येत असतो. त्यांच्या संपर्कात येणारी व्यक्ती कोरोनाबाधित आहे किंवा नाही याची माहिती नसल्याने कोरोनाचा फैलाव होण्याची दाट शक्यता आहे. यासोबतच या महिलांचे आरोग्यही महत्वाचे असल्याने त्यांचे लसीकरण होणे महत्वाचे असल्याचे गोऱ्हे यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले होते.
सिंहगर्जना प्रतिष्ठानकडून यासंदर्भात पुढाकार घेण्यात आला. याठिकाणी राहत असलेल्या 50 टक्क्यांपेक्षा अधिक महिलांकडे पॅन कार्ड, आधार कार्ड अशी शासकीय कागदपत्र नाहीत. त्यामुळे त्यांचे लसीकरण कसे करायचे असा प्रश्न होता. यामधून मार्ग काढत पालिकेकडून हे लसीकरण सुरु करण्यात आले. देहविक्रय करणाऱ्या महिलांकरिता पहिल्यांदाच लसीकरण मोहिम हाती घेण्यात आली आहे.