सोमवारी टोचणार लाख पुणेकरांना कोरोना लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:11 AM2021-04-04T04:11:45+5:302021-04-04T04:11:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शहरातली वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता आता शहरात जास्तीत जास्त लसीकरणाचा प्रयत्न केला जातो आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरातली वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता आता शहरात जास्तीत जास्त लसीकरणाचा प्रयत्न केला जातो आहे. यासाठीच आता गणपती मंडळ, तसेच सामाजिक संघटना आणि स्वयंसेवी संस्थांची मदत घेतली जाणार आहे. त्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांना रुग्णालयात नेऊन लसीकरणाचा करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. सोमवारी (दि. ५) एकाच दिवसात तब्बल एक लाखाहून अधिक लोकांचे लसीकरण करण्याचा प्रयत्न पुणे प्लॅटफॉर्म पर कोव्हीड रिस्पॉन्स आणि प्रशासनाच्या वतीने करण्यात येतो आहे.
प्रशासनाच्या वतीने लसीकरणासाठी ‘मिशन हंड्रेड डेज’ राबविण्यात येत आहे. शंभर दिवसांमध्ये जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण करण्याचा प्रयत्न प्रशासन करणार आहे. एकीकडे हा प्रयत्न होत असतानाच एका दिवसात जास्तीत जास्त लसीकरण करून ही क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न केला जातोय. त्याचाच भाग म्हणून येत्या सोमवारी एक लाखाहून जास्त लोकांचे लसीकरण एका दिवसामध्ये करण्याचा प्रयत्न संपूर्ण जिल्ह्यामध्ये केला जाणार आहे.
यासाठी आता सामाजिक संघटना आणि गणपती मंडळाच्या प्रतिनिधींची मदत घेतली जाणार आहे. आज या संदर्भात चर्चा करण्यासाठी प्रशासन, पीपीसीआर आणि वेगवेगळ्या रुग्णालयांचे डॉक्टर यांची बैठक झाली. यामध्ये शहरातल्या ७५ रुग्णालयांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. या मोहिमेच्या माध्यमातून देशातील सर्वाधिक लसीकरण एका दिवसात करण्याचा प्रयत्न तर शासन करणार आहे.
मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर (एमसीसीआयए)चे अध्यक्ष सुधीर मेहता म्हणाले, “आत्ताच्या संकटावर लसीकरण हाच उपाय आहे. त्यामुळेच जास्तीत जास्त लसीकरण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. लोकांनी लसीकरणासाठी यावे यासाठी आता आम्ही सामाजिक संघटना आणि गणपती मंडळांची मदत घेणार आहोत. गणपती मंडळाच्या प्रतिनिधींची आज बैठकही यासंदर्भात घेण्यात आली. या माध्यमातूनच सोमवारी आम्ही लसीकरणाचा रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न करतो आहोत. जास्तीत जास्त लसीकरण झाल्यासच जास्त लसींची मागणी करता येईल. लोकांनी पुढे येऊन लसीकरण करून घेणे आवश्यक आहे.”
विभागीय आयुक्त सौरभ राव म्हणाले, “या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व लसीकरण केंद्रावर सकाळी नऊ ते रात्री आठपर्यंत लसीकरण करण्यात येणार आहे. जास्तीत जास्त लोकांनी या मोहिमेमध्ये सहभागी होणे आवश्यक आहे”.