कोरोना लसींचे ‘कॉकटेल’ नुकसानकारक नाहीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:09 AM2021-05-30T04:09:35+5:302021-05-30T04:09:35+5:30

वैद्यकीय तज्ज्ञांचे मत : प्रतिकारशक्ती अधिक वाढणार पुणे : कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस वेगळ्या कंपनीचा आणि दुसरा डोस ...

Corona vaccine 'cocktails' are not harmful | कोरोना लसींचे ‘कॉकटेल’ नुकसानकारक नाहीच

कोरोना लसींचे ‘कॉकटेल’ नुकसानकारक नाहीच

Next

वैद्यकीय तज्ज्ञांचे मत : प्रतिकारशक्ती अधिक वाढणार

पुणे : कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस वेगळ्या कंपनीचा आणि दुसरा डोस वेगळ्या कंपनीचा घेतला तर काय होईल, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलेला आहे. केंद्र सरकारने पहिला डोस वेगळा आणि दुसरा वेगळा घेतला, तरी त्याचा विपरीत परिणाम होत नाही, असे स्पष्ट केले आहे.

पुण्यातील वैद्यकीय तज्ज्ञांनी देखील याला दुजोरा दिला आहे. सध्या पुण्यात प्रामुख्याने कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड या दोन लसी सरकारी यंत्रणेतून दिल्या जात आहेत. स्पुटनिक लसही काहींनी मिळवली आहे. पहिला डोस एका लसीचा आणि दुसरा डोस दुसऱ्या लसीचा टोचण्यास हरकत नसल्याचे मत नोंदविले आहे. प्रतिकारशक्ती तेवढीच वाढणार असून ताप, कणकण, अंगदुखी, पुरळ येणे हे तात्कालिक परिणाम जाणवू शकतात. मात्र, कोणत्याही दूरगामी दुष्परिणामांची भीती नसल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.

शहरात कोरोना प्रतिबंधक लसीकरण १६ जानेवारीला सुरू झाले. सुरुवातीच्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, त्यानंतर फ्रंटलाईन वर्कर, ज्येष्ठ नागरिकांसाठी लसीकरण सुरू झाले. त्यानंतर ४५ वर्षांपुढील आणि १८ वर्षांपुढील नागरिकांना लस देण्यास परवानगी देण्यात आली. पुण्यात ज्या नागरिकांना ज्या कंपनीच्या लसीचा पहिला डोस दिला गेला त्याच कंपनीचा दुसरा डोस देण्याबाबत खबरदारी घेण्यात येत आहे. पुण्यात नागरिकांना लस खुली केली गेली तेव्हा पहिला डोस वेगळा आणि दुसरा डोस वेगळा दिला गेल्याचा एकच प्रकार घडला.

चौकट

लसीकरणाबाबत जागतिक पातळीवर मार्गदर्शक सूचना आहेत. एकाच कंपनीचे दोन डोस दिल्यास अधिक फायदा होतो. मात्र, अनेक देशात लसींचा तुटवडा आहे. एकाच कंपनीचे दोन डोस मिळत नाहीत. त्यामुळे काही देशांनी वेगवेगळ्या कंपन्यांच्या लसी देण्याचा प्रयोग केला. विशेषतः इंग्लंडमध्ये हा प्रयोग करण्यात आला. त्याचा परिणाम सारखाच दिसून आला. प्रतिकार क्षमता ८० ते ९० टक्के तयार होत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला.

चौकट

दोन वेगवेगळ्या कंपन्यांच्या लसी घेतल्याचे तात्पुरते परिणाम दिसू शकतात. ताप येणे, अंगदुखी, कणकण, अंगावर पुरळ येणे आदी सौम्य लक्षणे दिसू शकतात. एक-दोन दिवसांच्या आरामात ते बरे होतील. त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे या तज्ज्ञानी सांगितले.

चौकट

शहरात आतापर्यंत झालेले लसीकरण

वयोगट लक्ष्य पहिला डोस। दुसरा डोस

आरोग्य कर्मचारी। ५६,०००। ५९,८१२। ४६,१३०

फ्रंटलाईन वर्कर। ५७,२६६। ६९,१५२। २५,२०६

६० च्या पुढील । ---। २,८१,३४२। १,३०,६६७

४५ ते ५९। --- । २,९४,६३२। ५२,६९०

१८ते ४४ ।---। ३५,७४४। ०००

एकूण। --- । ७,४०,६८२। २,५४,६९३

एकूण लसीकरण = ९, ९५, ३७५

चौकट

तज्ज्ञ डॉक्टर्स काय म्हणतात?

“वेगवेगळ्या कंपनीचे दोन वेगळे डोस घेण्यास हरकत नाही. त्याची परिणामकारकता कमी होणार नाही. मात्र, तात्पुरते परिणाम दिसू शकतील. एक-दोन दिवस आराम केल्यास ते बरे होतील. मात्र, त्याचे कोणतेही दुष्परिणाम होणार नाहीत. त्याने नुकसान होणार नाही.”

- डॉ. अमित द्रविड, व्हायरॉलॉजिस्ट, नोबल हॉस्पिटल

चौकट

‘शॉर्टेज’मधून नव्हे तर संशोधनातून निष्कर्ष

“दोन वेगळे डोस देण्याबाबत जागतिक पातळीवर संशोधन सुरू आहे. वेगळे डोस घेतले तर अधिक पूरक आणि परिणामकारक प्रतिकारशक्ती येत असल्याचे संशोधनामधून समोर आले आहे. को-व्हॅकसिन आणि कोविशिल्ड या लसी एकमेकांना पूरक आहेत. त्या घेतल्या तरी दुष्परिणाम होणार नाहीत. उलट अधिक चांगली प्रतिकारशक्ती येईल. त्यामुळे वेगळे डोस घेतले तरी हरकत नाही,” असे विषाणूजन्य आजारांवरील तज्ज्ञ डॉ. नितीन अभ्यंकर यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, की सध्या लसींचा तुटवडा असल्याने वेगवेगळ्या कंपन्यांचे डोस घेतले तरी चालेल, असे सांगितल्याचा नागरिकांचा समज होऊ शकतो. मात्र, हा तुटवड्यावरचा उपाय नाही तर जागतिक पातळीवर झालेल्या संशोधनातून आलेला निष्कर्ष आहे.

चौकट

“शहरात दहा लाखांच्या घरात लसीकरण झाले आहे. आतपर्यंत एखाद-दुसरीच घटना वेगळे डोस दिले गेल्याची घडली असेल. मात्र, त्याचे दुष्परिणाम झालेले नाहीत. लसीकरणात गडबड होऊ नये म्हणून लसींच्या प्रकारानुसार केंद्र वेगळे ठेवले जातात.”

- डॉ. वैशाली जाधव, सहायक आरोग्य अधिकारी

Web Title: Corona vaccine 'cocktails' are not harmful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.