Corona Vaccine : पुणे शहरात पंधरा ठिकाणी कोरोना लसीकरण; महापालिकेकडून आवश्यक तयारी पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2021 08:31 PM2021-01-11T20:31:39+5:302021-01-11T20:32:50+5:30
पुणे शहरातही १६ जानेवारी रोजी पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवकांना कोरोनावरील लस देण्यात येणार
पुणे : केंद्र सरकारने घोषणा केल्याप्रमाणे पुणे शहरातही १६ जानेवारी रोजी पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवकांना कोरोनावरील लस देण्यात येणार आहे. याकरिता पुणे महापालिकेने १५ ठिकाणी देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र पहिल्या टप्प्यात १६ जानेवारीला प्रत्यक्षात किती जणांना लस दिली जाईल हे महापालिकेकडे उपलब्ध होणाऱ्या लसवर अवलंबून आहे.
पुणे महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ़आशिष भारती यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनावरील लसीकरणासाठी पुणे महापालिकेने पहिल्या टप्प्यापासून चौथ्या टप्प्यापर्यंतची आवश्यक तयारी पूर्ण केली आहे. सर्व टप्प्यातील लसीकरणासाठी शहरात साधारणत: २ हजार ९७ लसीकरण बूथ उभारले जाणार आहेत. याव्दारे शहरातील सुमारे ४० लाख ३९ हजार ५९९ नागरिकांना लस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
१६ जानेवारी रोजी १५ क्षेत्रिय कार्यालयनिहाय लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली असून, याकरिता खाजगी, महापालिकेची रूग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रांची निवड करण्यात आली आहे़ ९९ बूथव्दारे होणाऱ्या या लसीकरणात एका दिवशी एका बूथवर शंभर जणांना लस दिली जाणार आहे.
पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवकांना लस दिली जाणार असल्याने, महापालिकेकडे नोंद केलेल्या ५२ हजार ७०२ जणांना आठ दिवसात लस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.यात महापालिकेतील ११ हजार ७४ आरोग्य सेवक तर खाजगी वैद्यकीय क्षेत्रातील ४१ हजार ६२८ जणांची नोंदणी झाली आहे़ या सर्व जणांना लस दोन टप्प्यात देण्यात येणार असल्याने वेस्टेज १० टक्के अधिकचा आकडा धरून महापालिकेला १ लाख १५ हजार ८२५ लसीचे डोसची आवश्यकता आहे.
--------------------------------
गरज पडली तर जम्बो हॉस्पिटल
पुणे महापालिकेच्या १५ क्षेत्रिय कार्यालयनिहाय १५ ठिकाणी लसीकरणची व्यवस्था करण्यात आली आहे. लसीकरणाचे नियोजन हे पूर्णत: किती प्रमाणात लस उपलब्ध होते यावर अवलंबून आहे. त्यामुळे लसीची मुलबक उपलब्धता झाल्यास, लसीकरणासाठी गरज पडल्यास शिवाजीनगर येथील जम्बो हॉस्पिटलचाही वापर केला जाणार असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.
--------------------------------------------------