Corona Vaccine : पुण्यात नागरिकांना लसीकरण रद्द झाल्याचा मेसेज; कोव्हॅक्सिन अन् कोविशिल्डचा गोंधळ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 04:40 PM2021-03-16T16:40:45+5:302021-03-16T16:45:31+5:30
पुण्यामध्ये काल कोविशिल्डचा साठा संपत आल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.
पुणे : कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्डच्या गोंधळाचा फटका आता थेट नागरिकांना बसतो आहे. लसीकरणाची अपॅाईंटमेंट रद्द झाल्याचे मेसेज आल्याने लसीकरणाला जायचे की नाही या गोंधळात हे नागरिक सापडले आहेत.
पुण्यामध्ये काल कोविशिल्डचा साठा संपत आल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर संध्याकाळी कोविशिल्ड तसेच कोव्हॅक्सिनचा साठा महापालिकेला पाठवण्यात आला. मात्र ही लस आली तरी कोविशिल्डचा साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाला नाही. त्यामुळे हा साठा दुसऱ्या टप्प्यातील लसीकरणासाठीच राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
याच गोंधळाचा थेट फटका आता नागरिकांना बसतो आहे. कोव्हिशिल्ड उपलब्ध नसल्यामुळे आता नागरिकांना तुमची नोंदणी रद्द झाली आहे असा मेसेज येत आहे.
यामुळे आपण नेमके जायचे का नाही असा गोंधळ नागरिकांच्या मनात निर्माण होते आहे. असे अनेक नागरिक लसीकरण केंद्रावर गर्दी करत आहेत.
एका नागरिकाने 'लोकमत'शी बोलताना सांगितले, “ मी ॲानलाईन नोंदणी केली होती. त्यानंतर मला वेळेचा मेसेज आला. त्याप्रमाणे मला बुधवारी वेळ देण्यात आली होती. मात्र,अचानक मेसेज आला की लसीकरण रद्द करण्यात आले आहे. मोबाईलवर मेसेज आला तरी ॲपवर तसे दिसत नसल्याने चौकशी करण्यासाठी मी थेट दवाखान्यात यावे लागले.”
महापालिका कर्मचाऱ्यांना विचारले असता ते म्हणाले “ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व लोकांना कोविशिल्ड दिले जात होते. मात्र आता कोव्हॅक्सिन आले आहे. त्यामुळे त्यांची कोविशिल्डची नोंदणी रद्द झाल्याचे मेसेज येत आहेत. मात्र केंद्रावर आलेल्या नोंदणी असलेल्या सर्व नागरिकांचे लसीकरण आम्ही करत आहोत.”