Corona Vaccine News : पुण्यात महापालिकेकडून कोरोना लसीकरणाची 'ड्राय रन' यशस्वी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2021 08:01 PM2021-01-08T20:01:35+5:302021-01-08T20:01:52+5:30
शहरात पहिल्या टप्प्यात एकाच दिवशी १८० लसीकरण बूथद्वारे १५ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येणार
पुणे : कोरोनावरील लसीच्या लसीकरणाची महापालिकेकडून शुक्रवारी रंगीत तालीम (ड्राय रन) घेण्यात आली. यामध्ये २९ जणांना लस देण्याची कार्यवाही केल्याचे प्रात्यक्षिक करण्यात आले. या प्रक्रियेत अॅपवर नोंदणी केली पण ऐनवेळी नकार दिल्यावर उभारलेल्या ‘कोविन अॅप सिस्टिम’मध्ये काही तांत्रिक अडचण येते का, याची तपासणी करण्यासाठी तीन जणांना नकार दिल्याची नोंदही करण्यात आली.
महापालिकेच्या राजीव गांधी रूग्णालयात (येरवडा) येथे ही रंगीत तालीम सकाळी नऊ ते दुपारी एक दरम्यान संपन्न झाली. यामध्ये २९ आरोग्य कर्मचाऱ्यांची लसीकरण अॅपमध्ये नोंद करून, तीन जणांचा नकार व २६ जणांना प्रत्यक्ष लस याबाबतची रंगीत तालीम यशस्वीरित्या पार पडली असल्याची माहिती महापालिकेच्या सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ.वैशाली जाधव यांनी दिली.
लसीकरण रंगीत तालीमच्यावेळी महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती, रुग्णालयाच्या प्रमुख डॉ. शुभांगी लोकरे, डॉ.अमित शहा आदी उपस्थित होते.राज्य शासनाच्या प्रतिनिधी डॉ़मधू पाटील व राज्य लसीकरण अधिकारी डॉ.डी.एन.पाटील यांच्या निरीक्षणाखाली ही प्रक्रिया पार पडली.
लसीकरण बुथवर सुरक्षा रक्षक, डाटा एंट्री आॅपरेटर, लस टोचक अशा ५ जणांचा समावेश करून सकाळी ही रंगीत तालीम सुरू झाली. यामध्ये अॅपवरील नोंद, ओळखपत्र तपासणी, लस देण्याचे प्रात्यक्षिक व नंतर अर्धा तास निरिक्षण खोलीत या व्यक्तीला बसवून ठेवणे ही प्रक्रिया पार पाडण्यात आली.लसीकरण प्रकियेत कोणत्या अडचणी येऊ शकतात यासाठी हा ड्राय रन होता.यातून एका व्यक्तीला लस देणे व नंतर अर्धा तास निरीक्षणाखाली ठेवणे या प्रक्रियेत सुमारे ४५ मिनिटांचा कालावधी लागत असल्याचे आढळून आले.
महापालिका आयुक्त कुमार यांनी, शहरात पहिल्या टप्प्यात एकाच दिवशी १८० लसीकरण बूथद्वारे १५ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येणार असल्याची माहिती यावेळी दिली.
--------