पुण्यात लाख कर्मचाऱ्यांना कोरोना लस, ५८ टक्केच उद्दिष्ट पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:12 AM2021-02-13T04:12:04+5:302021-02-13T04:12:04+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोनावरील लसीकरणाच्या पहिल्या टप्प्याला १६ जानेवारीपासून सुरुवात झाली. त्यानंतर ११ फेब्रुवारीपर्यंत पुणे विभागात १ ...

Corona vaccine for one lakh employees in Pune, only 58% of the target achieved | पुण्यात लाख कर्मचाऱ्यांना कोरोना लस, ५८ टक्केच उद्दिष्ट पूर्ण

पुण्यात लाख कर्मचाऱ्यांना कोरोना लस, ५८ टक्केच उद्दिष्ट पूर्ण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : कोरोनावरील लसीकरणाच्या पहिल्या टप्प्याला १६ जानेवारीपासून सुरुवात झाली. त्यानंतर ११ फेब्रुवारीपर्यंत पुणे विभागात १ लाख कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. पुणे विभागात लसीकरणासाठी १.७२ लाख आरोग्य कर्मचारी आणि १.१२ लाख अत्यावश्यक कर्मचाऱ्यांची नोंदणी झाली होती. यापैैकी ८९ हजार ८१६ आरोग्य कर्मचारी, तर ११ हजार ४३६ अत्यावश्यक कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. लसीकरणाचे ५८ टक्केच उद्दिष्ट गाठण्यात प्रशासनाला यश आले आहे.

पुणे विभागाचे आरोग्य उपसंचालक डॉ. संजय देशमुख म्हणाले, “लसीकरणासाठी २ लाख २४ हजार कर्मचाऱ्यांचे उद्दिष्ट आहे. त्यापैैकी १ लाख कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण २५ फेब्रुवारीपर्यंत, तर अत्यावश्यक कर्मचाऱ्यांचे लसीकरण १५ मार्चपर्यंत पूर्ण करायचे आहे. विभागाकडे सध्या दीड लाख डोस उपलब्ध आहेत. लसींचा दुसरा साठा १३ फेब्रुवारी रोजी मिळणार आहे.’

लसीकरणाच्या पहिल्या आठ दिवसांमध्ये लसींबद्दलच्या अफवा, भीती, गैैरसमज मोठ्या प्रमाणात पहायला मिळत होते. गैैरसमज आणि भीती कमी झाल्याने लसीकरणाचा टक्का हळूहळू वाढत आहे. अत्यावश्यक कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाला सुरुवात होऊन आठ दिवस झाले आहेत. अत्यावश्यक सेवांमध्ये पोलीस, महसूल खाते, पंचायत राज येथील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. संबंधित विभागांशी संपर्क साधण्याचे काम सुरू आहे. अत्यावश्यक कर्मचाऱ्यांचे केवळ ८-९ टक्के लसीकरण झाले आहे, अशी माहिती डॉ. देशमुख यांनी ‘लोकमत’ला दिली.

--------------------------

पुणे जिल्ह्यात १ लाख १३ हजार आरोग्य कर्मचा-यांनी को-विन अ‍ॅपच्या माध्यमातून लसीकरणासाठी नोंदणी केली होती. त्यापैैकी ५३ हजार ९६२ आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले आहे. अ‍ॅपवर ८४ हजार १५४ अत्यावश्यक कर्मचाऱ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैैकी ३८३८ जणांचे लसीकरण झाले आहे.

--------------------------

पुणे महानगरपालिका हद्दीत २३ हजार ३१३ आरोग्य कर्मचाऱ्यांचे, तर १८० अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. शहरात सध्या २५ लसीकरण केंद्रे कार्यरत आहेत. त्यापैैकी ७ केंद्रांनी १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे. यामध्ये दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, रुबी हॉल क्लिनिक, जहांगीर हॉस्पिटल, सह्याद्री हॉस्पिटल, ज्युपिटर, कमला नेहरू हॉस्पिटल, जोशी हॉस्पिटल आदी हॉस्पिटलचा समावेश आहे. आतापर्यंत ५ हजार २८५ कर्मचाऱ्यांना को-व्हॅक्सिनचे डोस देण्यात आले.

--------------------------

खासगी डॉक्टरांना लसीकरण कधी?

एकीकडे लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात यश येत नसल्याची परिस्थिती असताना खासगी डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी मात्र लसीकरणापासून वंचित असल्याचे चित्र शहरात पाहायला मिळत आहे. शहरातील तीन हजारांहून अधिक डॉक्टरांची नावेच अ‍ॅपवर सापडत नसल्याचे इंडियन मेडिकल असोसिएशनचे म्हणणे आहे.

Web Title: Corona vaccine for one lakh employees in Pune, only 58% of the target achieved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.