Corona vaccine : आजारापेक्षा इलाज भयंकर? लोणी काळभोर येथील लसीकरणासाठी केंद्रावर नागरिकांची एकच गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 16:02 IST2021-05-01T16:01:54+5:302021-05-01T16:02:13+5:30
हवेली तालुक्यातील लोणी काळभोर येथील प्राथमिक आरोग्य केेंद्रात आजपासून तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणास सुरुवात झाली.

Corona vaccine : आजारापेक्षा इलाज भयंकर? लोणी काळभोर येथील लसीकरणासाठी केंद्रावर नागरिकांची एकच गर्दी
लोणी काळभोर : राज्यात कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू झाला असला तरी त्यात अनंत अडचणी आहेत. केंद्र शासनाने आज ( १ मे ) पासून १८ वर्षापुढील सर्वांसाठी लसीकरण सुरू करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार पुणे जिल्ह्यात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणासाठी जिल्हा आरोग्य विभागाने नियोजन केले आहे. जिल्ह्यातील १४ केंद्रावर या वयोगटाचे लसीकरणास सुरूवात झाली आहे. पोर्टल नीट काम करत नसल्यानं प्राथमिक आरोग्य केंद्र लोणी काळभोर लसीकरण केंद्रांवर तरूणांसह ज्येष्ठ नागरिकांचीही गर्दी पाहायला मिळतेय. त्यामुळे आजारापेक्षा इलाज भयंकर अशी स्थिती तर निर्माण होणार नाही ना ? याची भीती वाढली आहे.
हवेली तालुक्यातील लोणी काळभोर येथील प्राथमिक आरोग्य केेंद्रात आजपासून तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणास सुरुवात झाली. आजच्या लसीकरणासाठी आरोग्य अधिकारी डॉ. दगडू जाधव व डॉ. रूपाली बंगाळे यांनी आवश्यक ती सर्व तयारी केली होती. आज लस घेण्यासाठी या वयोगटातील सुमारे २५० ते ३०० नागरिकांनी सकाळ पासूनच गर्दी केली होती. येथे जागा अपुरी असल्याने सोशल डिस्टन्सिंगचाही फज्जा उडाल्याचं दिसून आले ज्यांनी नोंदणी केली आहे, त्यांनाच लस दिली जाणार असे जाहीर करूनही ज्यांना एसमएमस मिळाले नाहीत तसेेेच शनिवार व रविवार लस मिळणार नाही हे जाहिर करूनही जेष्ठ नागरिक लसीकरण केंद्रावर आल्याने शनिवारी या गर्दीचे प्रमाण वाढले होते.
सकाळी लसीकरण सुरू झालेनंतर प्रत्येकजण आलेला एसएमएस डॉक्टर तसेच आरोग्य कर्मचारी यांना दाखवत होता. परंतू प्राथमिक आरोग्य केेंद्राचे संगणकावर दुपारी २ वाजले नंतर लस देण्यासाठी फक्त १०० जणांच्या नांवाची यादी आली असल्याने इतर नाराज होवून घरी परतले. परंतू काही महाभागांनी आम्हाला एसएमएस आला आहे. लस मिळालीच पाहिजे अशी भूमिका घेतली. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण पसरले होते. अखेर आरोग्य कर्मचारी, पोलीस यांनी त्यांना समजावून सांगितले नंतर येथील गर्दीचे प्रमाण कमी झाले.