Corona Virus : धक्कादायक! पुणे शहरातलं १ रुग्णालय, ४४ दिवस अन् १०० मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2020 04:40 PM2020-05-16T16:40:15+5:302020-05-16T16:43:33+5:30

अधिकारी बदलले, स्थिती जैसे थे

Corona Virus : 1 hospital, 100 deaths in 44 days at pune | Corona Virus : धक्कादायक! पुणे शहरातलं १ रुग्णालय, ४४ दिवस अन् १०० मृत्यू 

Corona Virus : धक्कादायक! पुणे शहरातलं १ रुग्णालय, ४४ दिवस अन् १०० मृत्यू 

Next
ठळक मुद्देकोरोनासह मधुमेह, उच्च रक्तदाब यांसह अन्य आजार असलेल्या रुग्णांचे मृतांमध्ये अधिक प्रमाण

पुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचा आकडा शनिवार (दि. १५) पर्यंत पावणे दोनशेच्या पुढे गेला असून एकट्या 'त्या ' रुग्णालयातील मृत्यूने शंभरी गाठली आहे. केवळ ४५ दिवसांतच २ ते ३ मृत्यूच्या सरासरीने रुग्णालयामधील मृत्युचे सत्र सुरूच आहे. सुरूवातीच्या काळात अचानक वाढलेल्या मृत्यूमुळे खळबळ उडाली होती. त्यामुळे अधिष्ठातांच्या बदलीसह टास्क फोर्सही स्थापन करण्यात आला होता. पण रुग्ण वाढत गेल्याने मृत्युचे प्रमाण कमी होऊ शकले नाही.  

राज्यात कोरोनाचा पहिला रुग्ण पुण्यात आढळून आल्यानंतर या रुग्णांमध्ये काही दिवसांतच वेगाने वाढ सुरू झाली. त्यामुळे नायडू रुग्णालयानंतर 'ससून' रुग्णालयामध्ये रुग्ण दाखल करण्यास सुरूवात झाली. प्रामुख्याने अत्यवस्थ रुग्णांना ससूनमध्ये दाखल करण्यात येत होते. दि. १ एप्रिलला रुग्ण दाखल होण्यास सुरूवात झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मृत्यूचे सत्र सुरू झाले. त्यानंतर दररोज २ ते ३ याप्रमाणे मृत्यू होतच राहिले.

त्यामुळे केवळ १४ दिवसांतच ३५ जणांचा मृत्यू झाला. परिणामी, शहरातील मृत्यूदर देशात सर्वाधिक ठरला. या स्थितीमुळे तत्कालीन अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. उपअधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांच्याकडे तात्पुरता भार सोपविण्यात आला. त्यानंतरच्या पुढील १५ दिवसांत मृतांची संख्या काही प्रमाणात कमी झाली. दि. १६ ते ३० एप्रिलदरम्यान २६ जणांचा मृत्यु झाला.  
लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात रुग्णसंख्या वाढल्याने मृत्युचा वेगही वाढला. दि. १ ते १६ मे या कालावधी सर्वाधिक ४० मृत्यू झाले. शनिवारी दुपारपर्यंत दोघांचा मृत्यू झाल्याने ससून मधील एकुण मृतांचा आकडा शंभरीपार गेला. रुग्णालयामध्ये सध्या प्राधान्याने गंभीर स्थितीतील रुग्णांनाच दाखल केले जात आहे. तसेच काही दिवसांपुर्वी रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या संसर्गासह मधुमेह, उच्च रक्तदाब यांसह अन्य आजार असलेल्या रुग्णांचे मृतांमध्ये अधिक प्रमाण आहे. सध्याही रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एकुण रुग्णांपैकी निम्म्याहून अधिक रुग्णांना अन्य कोणता ना कोणता आजार आहे. त्यामुळे येथील मृत्युचे प्रमाण अधिक आहे.  

----------  
अधिकारी बदलले, स्थिती जैसे थे
देशात सर्वाधिक मृत्युदर पुण्यात असल्याचे समोर आल्यानंतर ससून रुग्णालयाचे तत्कालीन अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांची तडकाफडकी बदली करून विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्यावर प्रशासकीय जबाबदारी सोपविण्यात आली. तर उपअधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे अधिष्ठाता बनले. शहरातील मृत्यू रोखण्यासाठी टास्क फोर्स स्थापन करण्यात आली. ससून रुग्णालयासाठी तांत्रिक सल्लागार नेमण्यात आले. पण त्यानंतर एक महिनाभरात ६६ जणांचा मृत्यू झाला आहे. अधिकारी बदलूनही मृत्यूचे प्रमाण कमी झालेले नाही. आता दोन दिवसांपुर्वी डॉ. म्हैसेकर यांच्याकडील पदभार काढून जमाबंदी आयुक्त एस. चोकलिंगम यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. 
-------------                                                                                                                                                                                   ससून रुग्णालयाची स्थिती  
दिवस                 मृत्यू
दि. २ एप्रिल          ०१ 
दि. १५ एप्रिल        ३५  
दि. ३० एप्रिल        ६१   
दि. १६ मे             १०१
---------------------

Web Title: Corona Virus : 1 hospital, 100 deaths in 44 days at pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.