Corona virus : पुणे शहरात शुक्रवारी १ हजार ६२१ कोरोनाबाधितांची वाढ ; ६२ जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2020 08:58 PM2020-09-25T20:58:34+5:302020-09-25T20:58:49+5:30
चाचण्यांचे प्रमाण पुन्हा वाढविले
पुणे : ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेंतर्गत प्रशासकीय यंत्रणा आता घरा-घरापर्यंत पोहचू लागली असून, यात कोरोनासदृश्य लक्षणे असलेल्या व्यक्तींना लागलीच कोविड-१९ ची तपासणी करण्यासाठी पाठविण्यात येत आहे. त्यामुळे शहरात पुन्हा कोरोना चाचण्याचे प्रमाण वाढले असून, शुक्रवारी तब्बल ६ हजार १४२ जणांची तपासणी करण्यात आली आहे़ आज प्राप्त झालेल्या चाचणी अहवालात १ हजार ६२१ नागरिकांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी १ हजार २५६ कोरोनाबधित कोरोनामुक्त झाले आहेत़ तर शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये ९४९ रूग्णांची प्रकृती गंभीर आहे़ यापैकी ५२३ जण व्हेंटिलेटरवर, ४२६ जण आयसीयूमध्ये तर ३ हजार ५१९ जणांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू आहेत़ आज दिवसभरात ६२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, यापैकी २१ जण पुण्याबाहेरील आहेत.
शहरातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ही आजपर्यंत १ लाख ३८ हजार ९५१ वर गेली असून, यापैकी अॅक्टिव्ह रूग्णसंख्या १७ हजार ७७३ इतकी आहे़ तसेच आतापर्यंत १ लाख १७ हजार ८८२ जण कोरोना मुक्त होऊन घरी परतले आहेत़. तर शहरात ३ हजार २९६ जणांची कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद घेण्यात आली आहे.
----------------------------------