Corona virus : पुणे शहरात गुरुवारी वाढले ११७ रुग्ण; एकूण रूग्णांची संख्या २ हजार १४६
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2020 12:05 PM2020-05-08T12:05:51+5:302020-05-08T12:07:03+5:30
बरे झालेले ८४ रुग्ण घरी
पुणे : पुणे शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढला असून गुरुवारी दिवसभरात ११७ रूग्णांची भर पडली. शहरात एकूण रूग्णांची संख्या २ हजार १४६ झाली आहे. दिवसभरात एकूण सात रुग्णांचा मृत्यू झाला असून कोरोनावर मात करीत पूर्णपणे बरे झालेल्या ८४ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेले एकूण ७२ रुग्ण अत्यवस्थ असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
गुरुवारी रात्री साडे आठपर्यंत शहरात नव्याने नोंद करण्यात आलेल्या ११७ पॉझिटिव्ह रूग्णांपैकी ससून रूग्णालयात ०८, नायडू रुग्णालयात ७५ तर खासगी रुग्णालयांमध्ये ३४ रुग्ण दाखल झाले आहेत. शहरातील उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ७२ जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
शहरात गुरूवारी सात मृतांची नोंद करण्यात आली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १२५ झाली आहे. एकूण ८४ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ६७१ झाली आहे. तर एक्टिव्ह रूग्णांची संख्या १ हजार ३५० झाली आहे.
-------------
दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण १ हजार ५९ नागरिकांची स्वॅब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत १८ हजार ६२८ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे. एकूण पालिकेच्या एक्टिव्ह रूग्णांपैकी पालिकेच्या दवाखान्यांमध्ये ९६८, ससून रुग्णालयात १२४ आणि खासगी रुग्णालयांमध्ये २५८ रुग्ण उपचार घेत आहेत.