Corona virus : पुणे शहरात मंगळवारी १६१४ कोरोनाबाधित झाले बरे; १२६४ नवीन रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2020 11:22 AM2020-09-23T11:22:38+5:302020-09-23T11:25:25+5:30
विविध रुग्णालयातील ९५७ रुग्ण अत्यवस्थ; ४६ रुग्णांचा मृत्यू
पुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये मंगळवारी दिवसभरात १२६४ रूग्णांची वाढ झाली. तर, दिवसभरात बरे झालेल्या १६१४ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील ९५७ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ४६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या १७ हजार ७६ झाली आहे.
उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ९५७ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ४९२ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून ४६५ रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत. तर, ३ हजार १६७ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत.दिवसभरात ३७ मृतांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये पुण्याबाहेरील १४ रूग्णांचा समावेश आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ३ हजार १६७ झाली आहे. दिवसभरात एकूण १ हजार ६१४ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या १ लाख १३ हजार ७८६ झाली आहे. तर, एकूण रुग्णसंख्या १ लाख ३४ हजार २९ झाली आहे. सक्रिय रूग्णांची संख्या १७ हजार ७६ झाली आहे.
-------------
दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण ५ हजार २१५ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत ५ लाख ८२ हजार २९ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.