Corona virus : पुणे शहरात २६८ नवीन कोरोनाबाधित; जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या १० हजार ८१२ वर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2020 09:53 PM2020-06-11T21:53:19+5:302020-06-12T11:57:36+5:30
शहरी भागासह ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांमध्ये वाढ
पुणे : शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढीची संख्या दररोज वरखाली होत असली तरी, वाढीच्या प्रमाणात कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण हे सुखावह आहे. गुरूवारी २६८ कोरोनाबाधितांची वाढ झाली असून, २९७ जण कोरानामुक्त होऊन घरी परतले आहेत.
पुणे शहरात गेल्या तीन महिन्यात एकूण ८ हजार ७७७ कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहे. तसेच या तीन महिन्यात तब्बल ५ हजार ७८२ रूग्ण पूर्णपणे बरेही झालेले आहेत. तर यापैकी ४१३ रूग्णांचा मृत्यू झाला आहे़ आज मृत्यू झालेल्या ७ जणांमध्ये तीन जण हे ससून हॉस्पिटलमध्ये, तीन जण हे खाजगी हॉस्पिटलमध्ये तर एक जण औंध उरो रूग्णालयात उपचार घेत होते. सद्यस्थितीला शहरात २१६ गंभीर रूग्णांची नोंद असून, यापैकी ५३ जण हे व्हेंटिलेटरवर आहेत.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील अॅक्टिव रूग्णांची संख्या ही २ हजार ५८२ एवढी आहे. यापैकी १९७ जण हे पालिकेच्या नायडू हॉस्पिटल व अन्य आयसोलेशन सेंटरमध्ये, तर ससून हॉस्पिटलमध्ये ७ व खाजगी हॉस्पिटलमध्ये ६४ जण उपचारासाठी दाखल झाले आहेत.
शहरातील ७ हजार ५२२ कोरोना संशयितांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. तर आज नव्याने २ हजार ४३ जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले असून, आजपर्यंत ६६ हजार ४८७ जणांचे स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत.
------------------------------
पुणे जिल्ह्यात गुरुवारी ४१८ नवीन रुग्ण वाढले ; ११ रुग्णांचा मृत्यू
पुणे : जिल्ह्यात पुणे शहरासह आता पिंपरी चिंचवड महापालिका, कॅन्टोनमेन्ट आणि ग्रामीण भागात देखील कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. गुरुवार (दि. ११ ) रोजी एका दिवसांत जिल्ह्यात ४१८ नवीन रुग्णांची वाढ झाली. तर ११ रुग्णांचा मृत्यू झाला. यामुळे आतापर्यंत पुणे जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या १० हजार ८१२वर जाऊन पोहचली आहे. तर कोरोनामुळे आता पर्यंत एकूण ४६० मृत्यू झाले आहेत.
जिल्ह्यात लॉकडाऊन शिथील केल्यानंतर कोरोना रुग्ण वाढीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये आता पर्यंत दररोज १० ते २० रुग्ण वाढत होते. परंतु जून महिन्यात गेल्या काही दिवसांत ही संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. गुरूवारी पिंपरी चिंचवड मध्ये तब्बल ९७ नवीन रुग्णांची भर पडली. तर ग्रामीण भागात १२ व कॅन्टोनमेन्ट हद्दीत १७ नवीन रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्यात रुग्ण वाढत असताना बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण देखील चांगले आहे. परंतु मृत्यू दर कमी करण्यात अपेक्षित यश येताना दिसत नाही.
------
एकूण बाधित रूग्ण : १०८१२
पुणे शहर : ८८९३
पिंपरी चिंचवड : १०५४
कॅन्टोनमेन्ट व ग्रामीण : ९०४
मृत्यु : ४६०