Corona virus : पुणे जिल्ह्यात एकाच दिवसांत ३०२ नवीन कोरोनाबाधित; एकूण रुग्णसंख्या ७ हजार ३१४
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2020 11:56 AM2020-05-30T11:56:19+5:302020-05-30T11:56:51+5:30
कोरोना विषाणुचा संसर्ग आता खेड्या पाड्यांपर्यंत
पुणे : गेल्या १५-२० दिवसांपूर्वी शहरी भागापुरता मयार्दीत असलेला कोरोना विषविषाणुचा संसर्ग आता ग्रामीण भागातील खेड्या-पाड्यांपर्यंत जाऊन पोहचला आहे. शुक्रवार (दि.29) रोजी पुणे जिल्ह्यात एकाच दिवसांत ३०२ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची वाढ झाली. यामध्ये पहिल्यांदाच ग्रामीण भागात एका दिवसांत २५ नवीन कोरोना बाधितांची वाढ झाली असून, यात एकट्या आंबेगाव तालुक्यात १५ नवीन रुग्ण सापडल्याने परिसरात धास्तीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पुणे जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांचा प्रादुर्भाव सुरूवातीला दीड -दोन महिने शहरी भागापुरता मर्यादित होता. ग्रामीण भागात रुग्ण सापडले ते देखील नगरपालिका क्षेत्रात आणि पुणे, पिंपरी चिंचवड शहरालगतच्या गावांमध्ये. परंतु आता थेड जुन्नर, आंबेगाव, खेड तालुक्यातील दुर्गम गावांमध्ये गेल्या तीन चार दिवसांत नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. ही बाबा आता जिल्हा प्रशासनासाठी धोक्याची घंटा ठरू शकते. पंतप्रधान नरेंद मोदी यांनी ग्रामीण भागाला, खेड्या-पाड्यांना कोरोनापासून वाचवले पाहिजे, दूर ठेवले पाहिजे असे म्हटलं आहे. परंतु पुणे जिल्ह्यात मात्र आता ग्रामीण भागात कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत असल्याचे दिसत आहे.
पुणे जिल्ह्यात शुक्रवारी ३०२ नवीन कोरोना बाधित रूग्णांची वाढ झाली. यामुळे आता एकूण रुग्ण संख्या ७ हजार ३१४ झाली आहे. तर ११ रुग्णांचा मृत्यू झाला असून, आत्तापर्यंत एकूण मृत्यू ३२१ झाले आहेत.
-----
एकूण बाधित रूग्ण : ७३१४
पुणे शहर : ६१५५
पिंपरी चिंचवड : ४९५
कॅन्टोनमेन्ट व ग्रामीण : ६६४
मृत्यु : ३२१
बरे झाले : ४२०६