Corona virus : पुणे शहरात विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या कोरोनाबधित रुग्णांपैकी ३६ रुग्ण गंभीर स्थितीत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2020 09:44 PM2020-04-23T21:44:47+5:302020-04-23T21:50:59+5:30
३६ पैकी २३ रुग्ण ससून रुग्णालयात असून त्यात ९ जणांना व्हेंटिलेटरवर...
पुणे : शहरातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या कोरोनाबधित रुग्णांपैकी ३६ जण गंभीर स्थितीत आहेत. त्यातील २३ रुग्ण ससून रुग्णालयात असून त्यापैकी ९ जणांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. ससून मधील उर्वरित १४ जणांना व्हेंटिलेटरची गरज नसली तरी त्यांची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान, गुरूवारी (दि. २३) शहरात तीन जणांचा मृत्यू झाला असून १६ जणांना घरी सोडण्यात आले.
शहरात गुरुवारी नवीन १०४ रुग्ण आढळून आल्याने एकूण बधितांचा आकडा 876 वर पोहचला. पहिल्यांदाच एका दिवसात नवीन रुग्णांचा आकडा शंभरी पार गेला आहे. तसेच गंभीर रुग्णांचा आकडाही वाढल्याने पुणेकरांच्या चिंतेत भर पडली आहे. गुरुवारी ससून सह विविध रुग्णालयांमध्ये ३६ रुग्णांची प्रकृती गंभीर होती. दिवसभरात तिघांचा मृत्यू झाल्याने एकूण मृत्यू ६० झाले आहेत. ससून रुग्णालयात मंगळवारी रात्री व गुरूवारी दोन जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ४८ वर पोहचला. बुधवारी रात्री मृत्यू झालेल्या गंजपेठेतील ५० वर्षी महिलेला लठ्ठपणाचा आजार होता. तिला १९ एप्रिलपासून लक्षणे असताना ती २१ एप्रिलला गंभीर स्थितीत रुग्णालयात दाखल झाली. त्यामुळे त्याच रात्री तिचा मृत्यू झाला. तिचा तपासणीसाठी पाठविलेल्या नमुन्याचा अहवाल बुधवारी रात्री प्राप्त झाला. तर गुरूवारी पर्वती दर्शन येथील ४१ वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला. त्याला २२ एप्रिलला दाखल करण्यात आले होते. कासेवाडी येथील 83 वर्षीय व्यक्ती व येरवडा येथील 56 वर्षीय महिलेचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास होता.
दरम्यान, ससून रुग्णालयामध्ये गुरूवारी नव्याने १५ कोरोनाबाधित रुग्ण दाखल झाल्याने एकुण रुग्णसंख्या १२९ वर पोहचली आहे. तर सध्या ७५ संशयित रुग्ण आहेत. बाधित रुग्णांपैकी ४१ रुग्णांना मधुमेह, उच्चरक्तदाब किंवा अन्य आजार आहेत. एकुण रुग्णांपैकी २३ जणांची प्रकृती गंभीर असून ९ जणांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.