Corona Virus : पुणे जिल्ह्यात एकाच दिवसांत ४५९ नवीन कोरोना रुग्ण; बाधितांची संख्या ६ हजार १५३ वर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2020 11:32 AM2020-05-26T11:32:07+5:302020-05-26T11:32:36+5:30
पुणे महापालिका हद्दीत प्रथमच एकाच दिवसात उच्चांकी ३९९ कोरोनाबाधित रूग्णांची नोंद
पुणे : पुणे जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण वाढीचा वेग प्रचंड झपाट्याने वाढत असल्याने आता स्पष्ट झाले आहे. सोमवारी एकाच दिवसांत जिल्ह्यात तब्बल ४५९ नवीन रुग्णांची भर पडली. तर ८ रुग्णांचा मृत्यू झाला. यामुळे आज अखेर जिल्ह्यात आज अखेर कोरोना बाधित रुग्णांची संख्या ६ हजार १५३ झाली आहे. तर एकूण मृत्यू २८० वर जाऊन पोहचले आहेत.
पुणे जिल्ह्यात प्रामुख्याने शहरी भागात कोरोना प्रादुर्भाव सुरूवाती पासूनच अधिक आहे. यामध्ये आता ग्रामीण भागाची भर पडली असून, ग्रामीण भागात देखील सरासरी नव्याने १० ते १५ पेक्षा अधिक रुग्ण सापडत आहेत.कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढत असलेली संख्या जिल्हा प्रशासनासाठी आता डोकेदुखी ठरत आहे. ग्रामीण भागात सोमवारी नव्याने १४ रुग्णांची भर पडली. तर सर्वाधिक वाढ अर्थातच पुणे शहरामध्ये झाली आहे.
------
पुणे महापालिका हद्दीत प्रथमच एकाच दिवसात उच्चांकी ३९९ कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली. यामुळे पुणे शहराने कोरोनाबाधित रूग्णांचा पाच हजाराचा आकडा पार केला असून, सोमवारपर्यंत शहरात एकूण ५ हजार १८१ कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली आहे. सोमवारी आढळून आलेल्या ३९९ रूग्णांमध्ये बहुतांशी रूग्ण हे कंटन्मेंट भागातीलच आहेत.
पुणे शहरात एकीकडे कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असतानाच, दुसरीकडे मात्र कोरोनामुक्त होणाऱ्या रूग्णांचे प्रमाणही मोठे आहे. सोमवारी १७९ कोरोनाबाधित रूग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले असून, आजपर्यंत शहरातील कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या ही आता २ हजार ७३५ इतकी झाली आहे. पुणे शहरात कोरोनाबाधित रूग्णांची एकूण संख्या जरी ५ हजार १८१ इतकी झाली असली तरी, यापैकी अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या २ हजार १८२ इतकी आहे़ यापैकी १७९ कोरोनाबाधित रूग्णांची प्रकृती गंभीर आहे. तर ४४ रूग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.
...................................................
एकूण बाधित रूग्ण : ६१५३
पुणे शहर : ५२४७
पिंपरी चिंचवड : ३८३
कॅन्टोनमेन्ट व ग्रामीण : ५२३
बरे झाले : 3195
मृत्यु : २८०