Corona virus : पुणे महापालिकेचे ४८ कर्मचारी कोरोनाबाधित, ५ जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2020 12:14 PM2020-05-22T12:14:43+5:302020-05-22T12:15:07+5:30
कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यापासून पुणे महापालिकेने कोरोनाविरोधात प्रतिबंधात्मक कार्यवाही केली सुरू
पुणे : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी कार्यरत असलेल्या, पुणे महापालिकेतील कर्मचाऱ्यांपैकी ४८ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर इतरांना कोरोनापासून वाचविताना, पालिकेतील ५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यापासून पुणे महापालिकेने कोरोनाविरोधात प्रतिबंधात्मक कार्यवाही सुरू केली. महापालिकेची आरोग्य यंत्रणा दिवसरात्र कामाला लागली. शहरातील एकमेव असे व १०० वर्षे जुने असलेले संसर्गजन्य आजारावरील उपचारासाठी प्रसिध्द असलेले डॉ. नायडू हॉस्पिटल कोरोनाबाधितांच्या रूग्णांवर उपचार करण्यासाठी सज्ज करण्यात आले. दरम्यान ९ मार्च रोजी पुण्यात पहिला कोरोनाबाधित रूग्ण आढळून आला आणि आज दोन महिन्यांमध्ये हा आकडा हजारातही गेला. या काळात कोरोनाला अटकाव करण्यासाठी पालिकेची सर्व यंत्रणा कामाला लागली़ कोरोनाबाधित रूग्ण आढळला की त्याच्या संपर्कातील व्यक्तींची तपासणी करणे, परिसर स्वच्छ करणे, माहिती गोळा करणे, संशयित व्यक्तींना क्वारंटाईन करणे, क्वारंटाईन सेंटर, आयसोलेशन सेंटरची देखभाल करणे आदी कामेही सुरू झाली.
९ मार्चनंतर अवघ्या पंधरा दिवसात म्हणजेच २५ मार्चला तर संपुर्ण देशातच लॉकडाउन करण्यात आले. यावेळी शासन आदेशानुसार कार्यालयातील पाच टक्के उपस्थिती वगळता शहरातील स्वच्छता, आरोग्य, कचरा व्यवस्थापन, पाणी पुरवठा, अग्निशामक दल, हॉस्पीटल्स अशा प्रत्येक ठिकाणची महापालिकेची यंत्रणा पुर्णत: रस्त्यावर उतरविण्यात आली. परंतू, या काळात महापालिकेच्या ४८ कर्मचाºयांना कोरोनाची बाधा झाली.
पालिकेच्या सेवेत असलेल्या व कोरोनाबाधित झालेल्यांमध्ये सर्वाधिक आकडा हा सफाई कर्मचाऱ्यांचा आहे. त्यांच्यासोबत शिपाई, बिगारी, लिपिक, बहुद्देशीय कामगार, आरोग्य निरीक्षक, वाहन चालक, बालवाडी शिक्षिका आणि नर्सेसचाही यात समावेश आहे. यापैकी ३७ कर्मचारी हे महापालिकेच्या कायम सेवेतील असून ११ कर्मचारी कंत्राटी आहेत. दुर्दैवाने आतापर्यंत ५ महिला कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून, यापैकी ४ सफाई कर्मचारी असून एक आया आहेत. उर्वरीत ४३ कर्मचाऱ्यांपैकी २४ कर्मचारी हे बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे़ तर अद्यापही १९ जणांवर उपचार सुरू आहेत.