Corona virus : पुण्यात २५ वर्षीय गर्भवती नर्सचा कोरोनामुळे मृत्यू, पतीलाही संसर्ग
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2020 09:48 AM2020-07-28T09:48:03+5:302020-07-28T10:09:31+5:30
दोनच दिवसांपूर्वी त्यांनी गर्भधारणेमुळे वैद्यकीय सेवेचे काम थांबवले होते.
पुणे : वारजे माळवडी येथील एका २५ वर्षीय परिचारिकेचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची दु:खद घटना घडली आहे. विशेष म्हणजे मृत्युच्या दोन दिवस अगोदरपर्यंत ती आपल्या वैद्यकीय सेवेचे कर्तव्य बजावत होती.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या नर्स महिला डेक्कन येथील संजीवन हॉस्पिटलमध्ये परिचारीका (नर्स) म्हणून कामाला होती. तिचे पतीदेखील भांडारकर रस्ता येथील एका खासगी लॅबमध्ये वैद्यकीय सेवेतच कार्यरत होते. ती महिला पाच महिन्यांची गर्भवती होती व दोनच दिवसापूर्वी तिने गर्भधारणेमुळे वैद्यकीय काम थांबवले होते.
सर्वप्रथम शनिवारी पहाटे तिला मळमळ वाटल्याने पहाटे पाचच्या सुमारास तिला तिच्या पतीने वारजे येथील माई मंगेशकर रुग्णालयात नेले. तेथे तिला सलाईन लाऊन तासभर उपचार करून घरी सोडून देण्यात आले. गर्भधारणेमुळे आपल्याला मळमळ होत असेल असे समजून त्यांनी फारसे मनावर घेतले नाही. त्यांना दिवसभर काही विशेष त्रास देखील जाणवला नाही. रविवारी पहाटे दोनच्या सुमारास पुन्हा उलटी व मळमळ जाणवल्याने ती काम करीत असलेल्या रसशाळा जवळील रुग्णालयात नेण्यात आले. तेथे पुन्हा सलाईन लाऊन तासभर उपचार करण्यात आले. त्या रुग्णालयात कोरोना रुग्ण अधिक असल्याने उगाच फारसा संपर्क टाळण्यासाठी त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. पहाटे तीनला घरी येऊन त्या पुन्हा झोपल्या.
दरम्यान, शंकेला वाव नको म्हणुन त्यांच्या (गर्भधारणेच्या) रक्ताच्या इतर तपासणी बरोबरच कोवीडची देखील चाचणीसाठी घरूनच सॅम्पल देण्यात आले. यानंतर सकाळी दहाच्या सुमारास पुन्हा त्यांना अस्वस्थ वाटून तब्येत खालावल्याने व तोंडाला काहीसा फेस आल्याने त्यांना पतीने तातडीने पुन्हा संजीवन रुग्णालयात आणले असता तेथेच सकाळी पावणे अकराच्या सुमारास डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याची माहिती दिली.
रविवारी संध्याकाळी उत्तरीय तपासणीपूर्वीच सकाळी घेतलेल्या चाचणी अहवालातून त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजल्याने मृतदेह पालिकेकडे सोपवला असल्याची माहिती उपनिरीक्षक अशोक येवले यांनी दिली.
पतीलाही कोरोनाची लागण
दीड वर्षापूर्वीच त्यांचे लग्न झाले होते. दरम्यान, तिच्या पतीलाही कोरोंनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. मुळचे नगरचे असलेले व घरी पती-पत्नी दोघेच असल्याने व येथे कोणी नातेवाईक नसल्याने पतीवर मात्र दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
ज्या रुग्णालयात ही नर्स महिला काम करत होत्या तेथील पेशंटची त्या फार मनापासून काळजी घेत असत. कारण त्यांना आई वडील नव्हते.म्हणून त्या प्रत्येक रुग्णात त्यांना पाहत असायच्या. अगदी दोन दिवसांपूर्वीपर्यंत त्यांनी वैद्यकीय कर्तव्य बजावले होते.