Corona virus : धक्कादायक! पुण्यात एका रात्रीत ५५ नवे कोरोना बाधित रुग्ण; तीन जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 01:22 PM2020-04-27T13:22:59+5:302020-04-27T13:28:03+5:30
पुण्यातील दिवसेंदिवस वाढती कोरोनाबाधितांची आणि मृतांची संख्या चिंतेची बाब
पुणे : पुण्यात सोमवारी सकाळी आणखी नवीन ५५ नवीन कोरोना बाधित आढळून आले असून आता पुण्यातील कोरोना बाधितांची संख्या १३१९ झाली आहे. त्याचवेळी पुण्यातील आणखी तिघांचा मृत्यू झाला असून शहरातील कोरोनाग्रस्त मृतांचा आकडा ८० झाला आहे.
घोरपडी गावातील ६४ वर्षाची महिला १८ एप्रिल रोजी मधुमेह, उच्च रक्तदाब असल्याने रुग्णालयात दाखल झाली होती. तिला २३ एप्रिलला कोरोनाची लागण झाली असल्याचे आढळून आले. तिचा रविवारी रात्री मृत्यू झाला.
पर्वती येथील ४८ वर्षाची महिला १८ एप्रिलला ससून रुग्णालयात दाखल झाली होती. त्याच दिवशी ती कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले होते. तिला अनेक आजार होते. मध्यरात्री तिचा मृत्यु झाला.
कोंढवा येथील ४८ वर्षाचा पुरुष २५ एप्रिल रोजी रुग्णालयात दाखल झाला होता. त्याला मधुमेह, किडनीचा आजार होता. सोमवारी सकाळी १० वाजता त्याचा मृत्यु झाला. त्यामुळे शहरातील मृत्यु पावलेल्यांची संख्या ८० झाली आहे.
पुणे जिल्ह्यात रविवारी दिवसभरात ८० नवीन कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या १२६४ पर्यंत पोहचली होती. सोमवारी सकाळी आलेल्या अहवालात तब्बल ५५ आणखी नवीन कोरोना बाधित असल्याचे आढळून आले़ त्यामुळे सकाळी ९ वाजताच्या अहवालानुसार पुण्यातील कोरोना बाधितांची संख्या तब्बल १३१९ झाली आहे.