Corona virus : पुणे शहरात ८ पोलिसांना कोरोनाची लागण; शंभरहून अधिक कर्मचारी क्वारंटाईन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2020 07:30 PM2020-04-28T19:30:46+5:302020-04-28T19:32:59+5:30
जे कर्मचारी कोरोना बाधित झाले. ते प्रामुख्याने पोलीस ठाण्याच्या इमारतीत ड्युटीला नव्हते..
पुणे : शहराच्या मध्य वस्तीतील एका पोलीस ठाण्यातील ८ पोलीस कर्मचार्यांना कोरोनाची लागण झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे. त्याच्या संपर्कात आलेले पोलीस ठाण्यातील जवळपास सर्व कर्मचार्यांना क्वारंटाईन करण्यात आले आले. त्याचवेळी या पोलीस ठाण्याच्या शेजारी असलेल्या पोलीस ठाण्यातील कर्मचारी या प्रकारामुळे घाबरुन गेले असून त्यांनी आमची करोना चाचणी करावी, अशी मागणी आहे. प्रसंगी चाचणीचा खर्च करण्याची तयारीही दर्शविली आहे.
या पोलीस ठाण्यातील शंभराहून अधिक कर्मचार्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. याशिवाय या पोलीस ठाण्याच्या हद्दीत अतिसंक्रमित भाग येत असल्याने इतर पोलीस ठाण्यातील कर्मचारी तसेच मुख्यालयातील जादा कुमक या पोलीस ठाण्याला देण्यात आली आहे. त्याद्वारे नाकाबंदी व पेट्रोलिंग सुरु ठेवण्यात आले आहे. सर्व पोलिसांनी आवश्यक ती खबरदारी घेण्यास सांगण्यात आले आहे. या पोलीस ठाण्यात जे कर्मचारी कोरोना बाधित झाले. ते प्रामुख्याने पोलीस ठाण्याच्या इमारतीत ड्युटीला नव्हते. त्यामुळे ते नियुक्तीला असलेल्या पोलीस चौक्या बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सध्या या पोलीस ठाण्यातील कामकाज दुसर्या मजल्यावरुन चालविले जात आहे. त्यामुळे या इमारतीत काम करणार्या पोलीस कर्मचार्यानी घाबरुन जाऊ नये, मात्र, त्याचवेळी आवश्यक ती खबरदारी जरुर घ्यावी. या पोलीस ठाण्यातील कर्मचार्यांना क्वारंटाईन केले असले तरी ते फोनद्वारे संपर्कात असून आवश्यक त्या मदत ते करत आहेत, असे वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी सांगितले.