Corona virus : पुणे जिल्ह्यात ८३३ नवीन कोरोनाबाधित ; एकूण रुग्णसंख्या २१ हजार ६९०
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2020 11:11 AM2020-06-30T11:11:58+5:302020-06-30T11:12:17+5:30
पुणे शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना बाधितांच्या रुग्ण वाढीचा वेग वाढला...
पुणे : जिल्ह्यात कोरोना पाॅझिटिव्ह रूग्णांचा वाढता आलेख कायम असून, सोमवारी ८३३ नवीन कोरोना पाॅझिटिव्ह रूग्णांची भर पडली. तर १३ रुग्णांचा मृत्यू झाला.यामुळे आता पर्यंत जिल्ह्यात कोरोना पाॅझिटिव्ह रूग्णांची संख्या २१ हजार ६९० वर जाऊन पोहचली आहे. तर आतापर्यंत ७३२ कोरोना बाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान लाॅकडाऊन शिथील केल्यानंतर ग्रामीण भागात देखील कोरोना रुग्ण वाढीचा वेग वाढला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कोरोना चाचण्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढवले आहे. यामुळे कोरोना पाॅझिटिव्ह रूग्णांची संख्या देखील वाढताना दिसत आहे. परंतु नागरिकांकडून देखील कोणत्याही प्रकारचे नियम, निर्बंध पाळले जात नाही. याचाच परिणाम कोरोना पाॅझिटिव्ह रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यात सोमवार (दि.२९) रोजी पिंपरी चिंचवड मध्ये २०१ तर ग्रामीण भागात २८नवीन रूग्णांची भर पडली. पुणे शहरामध्ये देखील रुग्ण वाढीचा वेग कायम आहे.
-----
शहरात दिवसभरात वाढले ६१७ रुग्ण
बाधितांचा आकडा १६ हजार ७४२ : ३३३ रुग्ण अत्यवस्थ, ०५ जणांचा मृत्यू
पुणे : शहरात सोमवारी ६१७ वाढ झाली असून कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा १६ हजार ७४२ झाला आहे. दिवसभरात बरे झालेल्या ४८२ जणांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील ३३३ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ०५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात ऍक्टिव्ह रुग्ण ६ हजार १९५ असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
सोमवारी रात्री नऊपर्यंत शहरात नव्याने नोंद करण्यात आलेल्या ६१७ पॉझिटिव्ह रूग्णांपैकी ससून रूग्णालयात १८, नायडूसह पालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये ३६५ तर खासगी रुग्णालयांमध्ये २३४ रुग्ण दाखल झाले आहेत. उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ३३३ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ६१ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून २७२ रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत.
शहरात सोमवारी ०५ मृतांची नोंद करण्यात आली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ६१८ झाली आहे. दिवसभरात एकूण ४८२ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. यामध्ये पालिकेच्या रुग्णालयांतील ३२६ रुग्ण, ससूनमधील २४ तर खासगी रुग्णालयांमधील १३२ रुग्णांचा समावेश आहे. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ९ हजार ९२९ झाली आहे. तर एक्टिव्ह रूग्णांची संख्या ६ हजार १९५ झाली आहे.
-------------
दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण ४ हजार ३८ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत १ लाख १२ हजार ४१ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.
एकूण बाधित रूग्ण : 21690
पुणे शहर : 16854
पिंपरी चिंचवड : 3127
कॅन्टोनमेन्ट व ग्रामीण : 1709
मृत्यु : 732