Corona virus : खासगी डॉक्टरांनी रुग्णालये बंद ठेवल्यास आपत्ती कायद्यानुसार कारवाई करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2020 06:32 PM2020-03-27T18:32:02+5:302020-03-27T18:42:02+5:30
कोरोना संशयित व्यक्तींवर उपचार करणाऱ्या काही डॉक्टरांना देखील कोरोनाची लागण झाल्याचे प्रकार समोर आले.
पुणे: कोरोनाचे संकट असताना पुणे विभागातील खासगी डॉक्टरांनी भीती पोटी दवाखाने बंद ठेवत असल्याचे समोर आले आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ही अत्यंत गंभीरबाब असून खासगी दवाखाने व ओपीडी बंद ठेवणाऱ्या डॉक्टरांवर त्वरीत आपत्ती व्यवस्थापन कायदा व साथ रोग नियंत्रण कायद्या अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी विभागातील सर्व जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.
कोरोना संशयित व्यक्तींवर उपचार करणाऱ्या काही डॉक्टरांना देखील कोरोनाची लागण झाल्याचे प्रकार समोर आले. त्यानंतर अनेक ठिकाणी खाजगी दवाखाने व डॉक्टरांनी आपले क्लिनिक बंद ठेवण्याचे प्रकार सुरू आहेत या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी पुणे विभागातील पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्हाधिकारी यांना त्यांच्या जिल्ह्यातील सर्व खाजगी दवाखाने व ओपीडी सुरू ठेवण्याचे आवाहन करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या आवाहनानंतर देखील खासगी दवाखाने व ओपीडी बंद ठेवल्या जात असतील तर त्यांच्यावर थेट आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 व महाराष्ट्र कोविड उपाययोजना 2020 व साथ रोग नियंत्रण कायदा 1897 नुसार कारवाई करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकारी यांना दिले आहेत. तसेच संबंधित डॉक्टरांची नोंदणी त्वरित रद्द करण्याची शिफारस इंडियन मेडिकल कौन्सिल व अन्य सक्षम प्राधिकरण यांच्याकडे करण्याचे देखील आदेश दिले आहेत.