Corona virus : पुणे जिल्ह्यातील रूग्णवाहिका घ्याव्यात प्रशासनाने ताब्यात ; गरजूंची अडवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2020 03:31 PM2020-04-11T15:31:13+5:302020-04-11T15:34:30+5:30
खासदार,आमदार यांनी त्यांच्या विकासनिधीमधून दिलेल्या रूग्णवाहिकांचाही व्यवसाय केला जात असल्याची चर्चा
पुणे: जिल्ह्यातील रूग्णवाहिका चालकांकडून गरजूंची अडवणूक केली जात आहे. नेहमीप्रमाणे किलोमीटर वर पैसे मागण्याऐवजी अवाजवी पैसे मागितले.जात आहेत. त्यामुळेच जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक तसेच खासगी रूग्णवाहिकाही किमान कोरोना काळात तरी जिल्हाधिकार्यांनी अधिग्रहित कराव्यात अशी मागणी होत आहे. विशेष म्हणजे खासदार,आमदार यांनी त्यांच्या विकासनिधीमधून दिलेल्या रूग्णवाहिकांचाही व्यवसाय केला जात असल्याची चर्चा आहे.
सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार गोसावी यांना असा अनूभव नूकताच आला. त्यांचे निगडी येथे एक मित्र आहेत. त्यांना तातडीच्या औषधोपचारासाठी पुण्यातील एका रूग्णालयात आणायचे होते. गोसावी यांनी रूग्णालयाची वेळ घेतली. रूग्णवाहिका शोधण्यास सुरूवात केली तर त्यांना अवाजवी पैसे मागितले जाऊ लागले. नेहमी किलोमीटर प्रमाणे पैसे घेतले.जात असताना अचानक त्यापेक्षा जास्त रक्कम मागितली जाऊ लागली. गोसावी यांनी विचारणा केली तर कोरोना चे कारण सांगितले गेले.
रूग्णालयातून डिस्चार्ज दिलेल्या रूग्णाला घरी नेण्यासाठी, दुसऱ्या दवाखान्यात नेण्यासाठी, घरून रूग्णालयात नेण्यासाठी अशा प्रत्येक वेळी रूग्णवाहिका लागते. त्याची गरज ओळखूनच खासदार, आमदार यांच्याकडून त्यांना मिळत असलेल्या स्थानिक विकास निधीतून किमान एक तरी रूग्णवाहिका खासगी किंवा सार्वजनिक रूग्णालयांना दिली जाते. तिचे नियंत्रण संबधित रूग्णालयाचे व्यवस्थापन अथवा त्या खासदार आमदाराच्या परिसरातील त्यांच्या माहितीचे सार्वजनिक मंडळ किंवा एखादी विश्वस्त संस्था करत असते.
त्यांच्यातीलही बर्याच जणांकडून रूग्णवाहिकांचा सेवा म्हणून नाही तर व्यवसाय म्हणून वापर होत असल्याचे गोसावी यांनी सांगितले.
मागील काही वर्षात कितीतरी खासदार, आमदार यांनी रूग्णवाहिकेसाठी निधी दिला आहे. व्यवस्थापनासाठीचा खर्च (चालक वेतन तसेच देखभालदुरूस्ती) जमेस धरून गरजू रूग्णांना माफक दरात रूग्णवाहिका ऊपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित रूग्णालयांवर टाकावी, किंवा त्यासाठीचे दर ठरवून द्यावेत एकूणच सार्वजनिक रूग्णवाहिकांबाबत धोरण ठरवण्याची गरज असल्याचे मत गोसावी यांनी व्यक्त केले. तसेच कोरोना विषाणूच्या आणीबाणी काळात तर जिल्ह्यातील सर्वच रूग्णवाहिका अधिग्रहित करून त्या गरजू रूग्णांसाठी ऊपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी त्यांनी केली.