Corona virus : संचारबंदीमुळे भडकला भाजीपाला, दूध मिळेना; प्रशासन कारवाई करणार का?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2020 11:12 PM2020-03-23T23:12:00+5:302020-03-23T23:15:01+5:30
चढ्या दराने विक्री करून नागरिकांची लूट
पुणे : पुण्यासह राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात संचारबंदी लागू करत असल्याचे जाहीर केले आहे. परंतु, यामधून भाजीपाला, किराणा दुकाने, दुधासह सर्व मेडिकल व अन्य अत्यावश्यक सेवा सुरूच राहणार असल्याचे वारंवार स्पष्ट केले आहे. परंतु, त्यानंतरदेखील पुण्यातील गुलटेकडी येथील मार्केट यार्डातील गूळ, भुसार बाजारासह फळे, भाजीपाला, कांदा-बटाटा मार्केट २५ ते ३१ मार्चदरम्यान बंद ठेवण्याचा निर्णय अडते व व्यापाऱ्यांनी घेतला आहे. व्यापाऱ्यांच्या बंदच्या निर्णयामुळे सोमवार (दि. २३)पासूनच भाजीपाल्याचे दर प्रचंड भडकले. दुपारी दोननंतर शहरातील सर्व लहानमोठ्या भाजीपाला विक्रेत्यांकडून चढ्या दराने फळे, भाजीपाल्याची विक्री सुरू करून नागरिकांची लूट करत असल्याचे चित्र शहरामध्ये दिसत होते.
संचारबंदीच्या काळात घराबाहेर पडण्यास बंदी असल्याने सोमवारी पुणेकरांनी भाजी खरेदीस गर्दी केली. यावेळी पोलिसांच्या अरेरावीसही सामोरे जावे लागले. संचारबंदीच्या काळात दूध, भाजीपाला कधी मिळणार, कोठे मिळणार या बद्दल साशंकता आहे. संचारबंदीच्या आदेशामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
भाजीपाला खरेदी असो की किराणा मालाचे दुकान, नागरिक खरेदीसाठी गर्दी करीत आहेत. यात अडते आणि व्यापारी यांनी मार्केट बंद राहणार असल्याचे जाहीर केल्याने नागरिकांमध्ये अधिकच गोंधळाची स्थिती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार रविवारी (दि. २२) पुणेकरांनी ‘जनता कर्फ्यू’ पाळला. या पार्श्वभूमीवर, पुण्यातील अडते असोसिएशनच्या वतीने शुक्रवार (दि. २०) ते रविवार (दि. २२) भाजीपाला, फळे मार्केट बंद ठेवले होते. त्यामुळे सोमवारी (दि. २३) मार्केट यार्डातील तरकारी विभाग, कांदा-बटाटा विभाग आणि फळे विभागात पहाटे तीनपासूनच लहानमोठे विक्रेते आणि स्थानिक नागरिकांनी खरेदीसाठी प्रचंड गर्दी केली. मार्केट यार्डात जिल्ह्याच्या कानाकोपºयातून शेतमाल विक्रीसाठी येतो. याशिवाय, मोठ्या प्रमाणात परराज्यातील मालदेखील पुण्याच्या मार्केट यार्डमध्ये विक्रीसाठी येतो. मार्केट यार्डमध्ये होणाºया गर्दीची अडत्यांनी धास्ती घेतली असून, सोमवारी तातडीने बैठक घेऊन २५ मार्च ते ३१ मार्च संपूर्ण मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. तर, कामगार नसल्याने आणि खबरदारी म्हणून दि पूना मर्चंट चेंबरनेदेखील ३१ मार्चपर्यंत सर्व गूळ आणि भुसार बाजार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
०००
परवाने रद्द करण्याचा व्यापारी, अडत्यांना इशारा
मुख्यमंत्र्यांसह जिल्हाधिकारी म्हणून संचारबंदीचे आदेश लागू करताना सर्व अत्यावश्यक सेवा सुरूच राहणार असल्याचे खूप वेळा स्पष्ट केले आहे. त्यानंतरदेखील व्यापारी, अडते बंद करण्याचा निर्णय घेत असतील, तर परिस्थितीचा आढावा घेऊन व्यापारी, अडते यांचे परवाने रद्द करण्यात येतील. तसेच, वेळप्रसंगी संबंधितावर पोलीस कारवाईदेखील करण्यात येईल. याशिवाय, भाजीपालविक्रेत्यांनी नागरिकांकडून अधिक दर घेतले, तर अशा विक्रेत्यांवरदेखील कडक कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिला आहे.
०००
संचारबंदी व खबरदारीमुळे निर्णय
संचारबंदीतून अत्यावश्यक सेवा वगळल्या असल्या, तरी सोमवारी (दि. २३) दुपारनंतर पोलिसांनी मार्केट यार्डात माल वाहतूक करणाºया वाहनचालकांवर व काही दुकानदारांवरदेखील कारवाई केली. तसेच, कोरोनामुळे व्यापाºयांकडील ९० टक्क्यांपेक्षा अधिक कामगारवर्ग आपापल्या गावी गेला आहे. कोरोनाबाधितांची वाढती संख्या पाहता, आम्ही आमच्या बंदवर ठाम आहोत.
- पोपटलाल ओस्तवाल, अध्यक्ष दि पूना मर्चंट चेंबर
०००
बाजार समिती प्रशासनाने सोय करावी
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तरकारी विभागात राज्याच्या विविध भागांतून व परराज्यांतूनदेखील शेतमाल विक्रीसाठी येतो. केवळ फळे, भाजीपाला आणि कांदा-बटाटा विभागामध्ये दररोज १५ ते २० हजार बाजार घटक एकत्र येतात. मार्केट यार्डामधून कोरोनाचा संसर्ग ग्रामीण भागात पसरण्याची शक्यता मोठी आहे. याचा विचार करून श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड असोसिएशनने २५ ते ३१ मार्चदरम्यान भाजीपाला मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अडत्यांचा बंद असला, तरी बाजार समिती प्रशासन भाजीपाला विक्रीची सोय उपलब्ध करून देऊ शकते. परंतु, अडते आपल्या बंदवर ठाम आहेत.
- रोहन उरसळ, सचिव, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड असोसिएशन
०००
बाजार घटकांची बैठक घेऊन मार्केट चालू ठेवणार
मंगळवारी (दि. २४) बाजार सुरू राहणार आहे. याबाबत सर्व बाजार घटकांची यामध्ये व्यापारी, अडते, कामगार संघटना बैठक घेऊन बुधवार (दि. २५)पासूनचा बंद मागे घेण्यासाठी प्रयत्न करू.
- बी. जे. देशमुख, पुणे बाजार समिती प्रशासक
०००