Corona Virus: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2020 04:46 AM2020-03-11T04:46:10+5:302020-03-11T04:46:28+5:30
आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर : गर्दीच्या ठिकाणी प्रवास शक्यतो टाळा
पुणे : दुबई येथून वर्ल्ड टूर करून आलेल्या पुण्यातील दोन व्यक्तींना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या दोन्ही रुग्णांना नायडू हॉस्पिटलमध्ये विलगीकरण कक्षात दाखल केले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या दोन्ही व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या रुग्णांचे कुटुंबीय, मित्र परिवार आणि त्यांच्या कार्यालयीन ठिकाणी असलेले अधिकारी, कर्मचारी या सर्व व्यक्तींच्या तपासण्या सुरू आहेत. यापैकी कुटुंबातील तीन व्यक्तींचे नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत.
पुणे शहरामध्ये कोरोनाचे दोन रुग्ण आढळून आल्यानंतर विभागीय आयुक्त म्हैसेकर यांनी तातडीने मंगळवारी जिल्हा प्रशासनाची बैठक घेतली. जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, आरोग्य विभागाचे अधिकारी बैठकीसाठी उपस्थित होते. बैठकीनंतर त्यांनी पत्रकार परिषदेत वरील माहिती दिली. डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले, दोन रुग्णांची तपासणी केलेली आहे. दोन्ही रुग्णांनी मागील पंधरा दिवसांत कोणकोणत्या ठिकाणी प्रवास केला त्याची माहिती घेतली आहे. हे दोन्ही रुग्ण फेबु्रवारीच्या शेवटच्या आठवड्यात दुबईला ४० जणांच्या गु्रपसोबत फिरायला गेले होते. ते १ मार्च रोजी परतले. त्या वेळी विमानतळावर तपासणी करण्यात येणाऱ्या देशांच्या यादीत दुबईचा समावेश नसल्याने त्याची तपासणी झाली नाही. या दोन्हींपैकी एका व्यक्तीला त्रास झाल्याने तिने ८ मार्च रोजी डॉक्टरकडून तपासणी करून घेतली. यावेळी त्यांची चाचणी पॉझिटीव्ह आली.
रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींवर ‘वॉच’
हे दोन्ही रुग्ण भारतात परत आल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती व ठिकाणांची माहिती घेण्यात आली आहे. रुग्णांच्या कुंटुंबातील ३ व्यक्तींचे नमुने तपासणीसाठी पाठविले आहे. तसेच, या व्यक्ती १ मार्च रोजी मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर त्यांनी मुंबई ते पुणे ओला टॅक्सीने प्रवास केला. या टॅक्सी ड्रायव्हरला सोमवारी रात्री नायडू हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेतले आहे. दोन्ही कोरोना रुग्णांसोबत दुबई येथे गेलेल्या राज्यातील अन्य ४० व्यक्तींची नावे व संपर्क क्रमांक असलेली यादी जिल्हा प्रशासनाने ताब्यात घेतली आहे.