Corona virus: वय ७४ वर्षे...हृदयरोगासह फुफ्फुसाचा आजार, तब्बल २८ दिवस कडवी झुंज अन् कोरोनावर यशस्वी मात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 09:29 PM2020-04-30T21:29:34+5:302020-04-30T21:37:37+5:30
चौदा दिवसांच्या तपासणीनंतरही त्यांना कोरोनाचा विळखा कायम होता. पण त्यानंतरही त्यांनी हार मानली नाही..
पुणे : वय ७४ वर्षे... हृदयरोगासह फुफ्फुसाचा आजार... त्यातच कोरोना विषाणुचा विळखा... सर्वकाही त्यांच्या जगण्याच्या आशेच्या आड येणारे... पण ते हरले नाहीत. तब्बल २८ दिवस त्यांनी कोरोनाच्या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी झुंज दिली. चौदा दिवसांच्या तपासणीनंतरही त्यांना कोरोनाचा विळखा कायम होता. पण त्यानंतरही त्यांनी हार न मानता हा लढा २८ दिवसांनी जिंकला. ससून रुग्णालयातून या कोरोना वॉरियर्सला गुरूवारी (दि. ३०) यशस्वी उपचारानंतर घरी सोडण्यात आले. तसेच बुधवारी एका गर्भवती महिलेला कोरोनामुक्त झाल्यानंतर घरी पाठविण्यात आले.
ससून रुग्णालयातून गुरूवारी एकुण आठ जणांना घरी सोडण्यात आले. त्यामध्ये पाच पुरूषांचा समावेश आहे. मंगळवार पेठेतील ७४ वर्षीय व्यक्तीला ससूनमध्ये दि. २ एप्रिल रोजी दाखल करण्यात आले होते. ते दाखल झाले त्याचदिवशी अत्यवस्थ होते. त्यांना आधीपासून हृदयरोग व फुफ्फुसाचा जुनाट आजार होता. उच्च रक्तदाबाचाही त्रास होता. त्यामुळे त्यांना लगेच अतिदक्षता विभागात हलविण्यात आले. कोरोनाची लक्षणे असल्याने त्यांना नमुना तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आला. या तपासणीत त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यातच अन्य आजारही असल्याने त्यांची विशेष काळजी घेण्यात येत होती. पण या आजारांमुळे त्यांचा कोरोना संसर्ग कमी झाला नाही. चौदा दिवसांच्या तपासणीत त्यांचा संसर्ग कायम असल्याचे दिसून आले. पण त्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत गेली. अखेर काही दिवसांपुर्वी प्रयोगशाळेच्या अंतिम अहवालात ते कोरोनामुक्त झाल्याचे दिसून आले. त्यामुळे प्रकृती स्थिर झाल्यानंतर गुरूवारी त्यांना घरी सोडण्यात आले.
गुरूवारी घरी सोडण्यात आलेले आणखी दोन रुग्णांची प्रकृती दाखल झाले तेव्हा अत्यवस्थ होती. त्यामध्ये येरवडा येथील ५४ वर्षीय व घोरपडी येथील ४० वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. दोघांनाही उच्च रक्तदाबाचा त्रास होता. ते अनुक्रमे १० व ४ एप्रिलला दाखल झाले होते. त्यांची प्रकृती स्थिर झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. तसेच पर्वती येथील ६० वर्षीय व चिंचवड येथील ३८ वर्षीय व्यक्तीही कोरोनामुक्त होऊन घरी परतले. बुधवारी सायंकाळी एका ३१ आठवड्यांची गर्भवती महिलेलाही घरी सोडण्यात आले. ती मार्केटयार्ड भागातील असून २५ वर्षे वय आहे. रुग्णालयात दाखल जाली तेव्हा तिची प्रकृती स्थिर होती.
------------
तीन परिचारिका कोरोनामुक्त..
ससून रुग्णालयातील तीन परिचारिकाही कोरोनामुक्त झाल्या असून त्यांना गुरूवारी घरी सोडण्यात आले. या तिघीही ससून रुग्णालयाच्या जुन्या इमारतीत कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करत होत्या. या दरम्यानच त्यांना कोरोनाचा विषाणुचा संसर्ग झाला होता. त्यांच्यावर ससून मधील कोविड रुग्णालयात उपचार सुरू होते. तिघींनाही सौम्य स्वरूपाची लक्षणे होती. दोन परिचारिका ३१ वर्षीय असून आकुर्डी व आळंदी येथील आहेत. तर एक ४७ वर्षीय परिचारिका लोहगाव येथील आहे.