Corona virus : आंबेगाव तालुका होतोय रेड झोन; तालुक्यात एकाच दिवसात आढळले १५ रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2020 10:24 PM2020-05-29T22:24:55+5:302020-05-29T22:25:30+5:30
आंबेगाव तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आंबेगाव तालुक्यात एकूण २५ कोरोनाबाधित असून, त्यापैकी एक बरा झाला आहे...
मंचर : आंबेगाव तालुक्यात शुक्रवारी कोरोनाबाधितांचा उच्चांक झाला आहे. तालुक्यात एकाच दिवशी तब्बल १५ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. यामध्ये वडगाव काशिंबेग येथे सात रुग्ण, तर फदालेवाडी ३, पेठ येथे २ तर एकलहरे, घोडेगाव, शिनोली येथे प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे. तालुक्यात एकूण २५ कोरोनाबाधित असून, त्यापैकी एक बरा झाला आहे.
जिल्ह्यात आंबेगाव तालुका सुरुवातीला कोरोनामुक्त होता. मात्र, मुंबईवरून आलेल्या नागरिकांमुळे कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. आतापर्यंत दहा रुग्ण सापडले होते. त्यापैकी शिनोली येथील एक रुग्ण बरा होऊन घरी परतला आहे. गुरुवारी तालुक्यातून ५० जणांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी १५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर आंबेगाव तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे.
वडगाव काशिंबेग येथील ४७ वर्षीय पुरुष कोरोना पॉझिटिव्ह निघाला होता. त्याच्या घरातील १३ जणांचे नमुने तपासणीसाठी नेले असता ६ जण पॉझिटिव्ह निघाले. वडगाव काशिंबेग गावातील दुसरा एक पुरुष कोरोना पॉझिटिव्ह निघाला आहे. फदालेवाडी येथील तीन रुग्ण पॉझिटिव्ह निघाले आहेत, तर पेठ येथील दोन रुग्ण पॉझिटिव्ह आहेत. तालुक्यातील लोकसंख्येच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकाचे गाव असलेल्या घोडेगावतही एक रुग्ण आढळला आहे. शिनोली, एकलहरे येथे प्रत्येकी एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळला. सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वडगाव काशिंबेग गावात आढळले. पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांनी तातडीने गावात येऊन सूचना दिल्या. प्रांत जितेंद्र डूडी, तहसीलदार रमा जोशी, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे यांनी तातडीने रुग्ण सापडलेल्या गावात जाऊन प्रशासकीय काम सुरू केले आहे.
चौकट :
कामगार व उत्पादन शुल्कमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी कालच मंचर येथे आढावा बैठक घेऊन सरकारी व खासगी वैद्यकीय यंत्रणेला सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोरोनाची गंभीर परिस्थिती निर्माण होत असल्याने वळसे-पाटील स्वत: बारीक लक्ष ठेवून आहेत.
बाधित गावे प्रतिबंधित क्षेत्र जाहीर
घोडेगाव : आंबेगाव तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अचानक वाढल्याने या आठ गावांतील प्रतिबंधित क्षेत्र पूर्णत: बंद करण्यात आले आहे. या ठिकाणी कोरोना सर्वेक्षण पथकांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती प्रांत अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली. साकोरे, शिनोली, निरगुडसर, जवळे, वडगाव काशिंबेग, पिंगळवाडी-कोटमदरा, गिरवली, एकलहरे व वळती या आठ गावांमध्ये कोरोनाबाधित रूग्ण आढळल्याने ही गावे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली. आता या गावांमध्ये कोरोना सर्वेक्षण पथकांची नियुक्ती करण्यात आली. यामध्ये साकोरे येथे ७ सर्वेक्षण पथक, शिनोली येथे १६, निरगुडसर येथे ३७, जवळे ५, वडगाव काशिंबेग १६, पिंगळवाडी -कोटमदरा १५, गिरवली ११ व वळती २३ असे एकंदरीत १२८ सर्वेक्षण पथकांची नियुक्ती करण्यात आली असून, यामध्ये १७५ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.