Corona virus : चिंताजनक 'जम्बो' तुन 'आशेचा किरण' ; पहिला कोरोना रुग्ण बरा होऊन पडला बाहेर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2020 08:04 PM2020-09-07T20:04:33+5:302020-09-07T20:18:39+5:30
'जम्बो'तुन दोन रुग्ण व्हेंटिलेटरवरुन बाहेर
पुणे : जम्बो कोविड सेंटरमधील कामकाज पुणे महापालिका प्रशासनाने ताब्यात घेतल्यानंतर सुधारणा दिसू लागल्या आहेत. रविवारी ऑक्सिजनवर असलेला कोरोनाचा पहिला रुग्ण बरा होऊन घरी गेला. तसेच व्हेंटिलेटरवर असलेल्या दोन रुग्णांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्याने त्यांना आयसीयूमधून बाहेर काढण्यात आल्याचे महापालिकेच्या अतिरीक्त आयुक्त रुबल अगरवाल यांनी सांगितले.
जम्बोमध्ये येत्या दोन-तीन दिवसात आणखी सुधारणा केल्या जाणार आहेत. यासोबतच रुग्णालयातील स्वच्छता विषयक कामांमध्येही विशेष लक्ष घालण्यात आले आहे. सर्व कामावर सीसीटीव्हीद्वारे लक्ष ठेवण्यात येत असून कर्मचा-यांना जबाबदारीचे वाटप करण्यात आले आहे. लाईफलाईन या संस्थेकडून उपचारांमध्ये हलगर्जीपणा केल्यामुळे रुग्णांना व्यवस्थित उपचार मिळत नसल्याचे तसेच रुग्णांचा मृत्यू होत असल्याचे आरोप झाले. पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या मृत्यूनंतर जम्बो रुग्णालयाच्या व्यवस्थापनावर टिकेची झोड उठली.
त्यानंतर, जम्बोसाठी समन्वय समिती गठित करण्यात आली.
महापालिकेने जम्बोची सर्व सुत्र ताब्यात घेतल्यानंतर ५० डॉक्टर्स आणि १२० वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ जम्बोमध्ये पुरविले. येथील व्यवस्थेतील त्रुटी सुधारुन रुग्णांना चांगल्या दर्जाचे उपचार मिळावेत याकरिता प्रयत्न करण्यात येत असल्याचे अगरवाल म्हणाल्या.
=====
रुग्णांना पाचवेळा जेवण
रुग्णांना वेळेवर जेवण मिळत नसल्याच्या तक्रारी मागील आठवड्याभरात आल्या. त्यामुळे पालिकेने आता जम्बो रुग्णालयामध्ये दिवसामधून पाच वेळा जेवण देण्यास सुरुवात केली आहे. हे जेवण दर्जेदार असावे आणि त्यामधून पोषणतत्व मिळावीत याकडे विशेष लक्ष दिले जात आहे.
=====
बाऊन्सर्स हटविले
रुग्णांची माहिती घेण्यासाठी जाणाऱ्या नातेवाईक तसेच माध्यमकर्मींना गेटवरच अडविले जात होते. जम्बोच्या प्रवेशद्वारावर नेमण्यात आलेले ‘बाऊन्सर्स’ अरेरावी करत होते. मनसेच्या महिला अध्यक्षा रुपाली पाटील-ठोंबरे यांनी तर गेटवरुन चढून जाऊन आंदोलन केले होते. यामध्ये महापालिकेने लक्ष घालत सुरक्षारक्षक नेमले आहेत. बाऊन्सर्सला हटविण्यात आले आहेत.
=====
रुग्णांशी बोलता येणार व्हिडीओ कॉलवरुन
रुग्णांसोबत बोलता येत नाही, त्यांची स्थिती कळत नाही अशा तक्रारी होत्या. रुग्णांची स्थिती नातेवाईकांना समजावी तसेच त्यांना थेट बोलता यावे याकरिता पालिकेने व्हिडीओ कॉलिंगची व्यवस्था केली आहे. त्याकरिता दोन टॅब खरेदी करण्यात आले आहेत. या टॅबवरुन व्हिडीओ कॉलिंगद्वारे थेट नातेवाईकांशी रुग्णांचा संवाद घडवून आणला जाणार आहे.
====
नातेवाईकांसाठी ‘वेटिंग एरिया’
रुग्णांच्या नातेवाईकांना बसण्यासाठी प्रतिक्षा कक्ष व मदत कक्ष उभारण्यात आला असून त्यांना चहा-नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याठिकाणी दिवसातून तीनवेळा रुग्णांची माहिती दिली जाणार आहे.