Corona virus : पुणे शहरात विनामास्क बहाद्दारांवर कारवाई करणाऱ्या दोन पोलिसांवर हल्ला,चौघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2020 03:12 PM2020-09-08T15:12:56+5:302020-09-08T15:15:48+5:30
विना मास्क असणार्यांवर शहरात जोरदार कारवाई
पुणे : शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विनामास्क फिरणाऱ्यांवर सर्वत्र मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरु आहे. त्याचवेळी दोन ठिकाणी कारवाई करताना पोलिसांना मारहाण करण्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे़ कोरेगाव पार्क व सातारा रोडवरील पुष्प मंगल चौकात हे प्रकार घडले.
शहरासह पुणे जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. त्यामुळे विना मास्क फिरणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत़ शहरात जागोजागी पोलिसांकडून कारवाई होत आहे.
याबाबत पोलीस हवालदार जयवंत देवीदास भालेराव (वय ५२) यांनी कोरेगाव पार्क पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी इलियास हासीम आतिया (वय ५५), हासिम इलियास आतिया (वय २३, दोघे रा़ अवधुत अपार्टमेंट, टिंगरेनगर) यांना अटक केली आहे. भालेराव हे बंडगार्डन वाहतूक विभागात कार्यरत असून ते सेंट मिरा बसस्टॉपजवळ सोमवारी सायंकाळी कारवाई करीत होते. त्यावेळी मोटारसायकल वरुन जाणाºया मुलीने मास्क घातला नसल्याचे पाहून त्यांनी थांबण्याचा इशारा केल्यावरही चालक न थांबल्याने त्यांनी पाठलाग करुन त्यांना थांबविले. त्यावेळी इलियास याने त्यांच्या कानाखाली मारली तर, मुलीने शिवीगाळ करुन त्यांना लाथाबुक्यांनी मारहाण केली.
दुसर्या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक छाया गादिलवाड यांनी सहकारनगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन ऋषीकेश हनुमंत राऊत (वय ३५, रा़ भाग्यश्री गार्डन सोसायटी, धनकवडी) आणि शौनक अनिल पानसे (वय ३९, रा़ पदमदर्शन सोसायटी, सहकारनगर) यांना अटक केली आहे. गादिलवाड या सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता सातारा रोडवरील पुष्प मंगल चौकात पोलीस शिपाई फुंदे व चव्हाण यांच्यासमवेत कर्तव्यावर होत्या़ यावेळी ते विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करीत होते़ ऋषीकेश व शौनक हे विनामास्क फिरत असल्याने त्यांना अडवून कारवाई करती असताना त्यांनी पोलिसांना धक्काबुक्की करुन सरकारी कामात अडथळा आणला तसेच स्वत:चे मोबाईलमध्ये व्हिडिओ शुटींग केले.
शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना नागरिकांकडून अजूनही ते गांभीर्याने घ्यावेसे वाटत नाही़. त्यावर कारवाई करु लागल्यास पोलिसांना मारहाण सहन करावी लागत आहे.