Corona virus Baramati : शरद पवारांच्या काटेवाडीत १४ दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर; वाढत्या रुग्णसंख्येमुळे प्रशासनाचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2021 06:49 PM2021-06-24T18:49:30+5:302021-06-24T18:54:55+5:30
शरद पवार यांच्या काटेवाडी गावात रुग्ण वाढत असल्याने १४ दिवसांच्या लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे.
बारामती : राज्यात काही जिल्हे वगळता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे.मात्र एकीकडे मोठ्या शहरांमधील रुग्णसंख्या कमी होत असतानाच ग्रामीण भागात पॉझिटिव्ह रुग्णांची टक्केवारी वाढत आहे. यामुळे प्रशासनापुढे नवे आव्हान उभे राहिले आहे. पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये मागील महिन्याभरापासून रुग्णसंख्येत घट झाली आहे. परंतु, ग्रामीण भागातील पॉझिटिव्ह रेट ९ टक्क्यांच्याजवळ आहे. यातच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या काटेवाडीत कोरोना रुग्ण आढळून येत आल्याने प्रशासनाने तिथे १४ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे.
शरद पवार यांच्या काटेवाडी गावात रुग्ण वाढत असल्याने १४ दिवसांच्या लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे.या कालावधीत प्रशासनाने नागरिकांना निर्बंधांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येने प्रशासनाचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे काटेवाडी गावात शंभर टक्के लॉकडाऊनचे पालन करण्यात येत आहे. मंगळवारी गावात कोरोना तपासणी चाचणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. त्यात नागरिकांची अँटिजेन टेस्ट केल्यानंतर २७ नवीन कोरोनाबाधित सापडले होते. याच पार्श्वभूमीवर प्रशासना कडक लॉक डाउनचा निर्णय घेतला आहे.
जिल्ह्यात आता पर्यंत केवळ ११ टक्के लोकांचेच लसीकरण पूर्ण
राज्यासह जिल्ह्यात जानेवारी महिन्यात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली, पण सहा महिन्यांत जिल्ह्यातील केवळ ११ टक्के लोकांचे कोरोना लसीकरण पूर्ण म्हणजे दोन्ही डोस घेऊन झाले आहेत. तर ४२ टक्के लोकांनी पहिला डोस झेतला आहे. दरम्यान केंद्र शासनाने आता पुरेशा प्रमाणात लसची डोस उपलब्ध करून देणार असल्याचे म्हटले असून, जिल्ह्यात दिवसाला दीड लाख लोकांचे लसीकरण करण्याची तयारी प्रशासनाने केली आहे.
१८ ते ४४ वयोगटातील केवळ एक टक्का लोकांचे लसीकरण
केंद्र शासनाने १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांचे देखील लसीकरण सुरू केले आहे. जिल्ह्यात या वयोगटातील सुमारे २५ लाख ३५ हजार ४२६ लाभार्थी अपेक्षित आहेत. यापैकी ४ लाख १६ हजार ७६५ लोकांनी पहिला तर दुसरा डोस घेतलेल्या लोकांची संख्या केवळ २२ हजार ८८ म्हणजे एक टक्का एवढी आहे.