Corona virus : 'कम्युनिटी स्प्रेड'चे प्रमाण निश्चित करण्यासाठी घेणार रक्ताचे नमुने
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2020 12:08 PM2020-07-21T12:08:30+5:302020-07-21T12:09:13+5:30
पुणे विद्यापीठ आणि आयशरचा उपक्रम
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, आयशर यांनी कोरोनाच्या अभ्यासाकरिता तसेच सामाजिक संसर्गाचे (कम्युनिटी स्प्रेड) प्रमाण शोधण्याकरिता नागरिकांच्या रक्तातील नमुने घेतले जाणार आहेत. या तपासणीकरिता पुणे महापालिकेकडे परवानगी मागण्यात आली होती. त्याला परवानगी देण्यात आली असून पुणे महापालिकाही या अभ्यासात सहभागी होणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त (जनरल) रुबल अगरवाल यांनी दिली.
या तीनही संस्थाच्या सहयोगातून शहरातील कोरोनाच्या प्रसाराची परिस्थिती व व्यवस्थापन करण्यासाठी नागरिकांच्या रक्ताचे नमुने घेण्यात येत आहेत. या प्रकल्पासाठी स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आली असून हे स्वयंसेवक ठरवून दिलेल्या भागांत घरोघरी जाऊन स्वेच्छेने रक्ताचे नमुने घेतील. रक्ताचे नमुने द्यायचे की नाही हे नागरिकांनी ठरवायचे आहे. रक्त संकलनामधून कोरोनाविषयक संशोधन केले जाणार आहे. नागरिकांचे प्रत्येकी ५ मिलीलिटर रक्त घेतले जाणार असून नागरिकांनी या कार्यात सहकार्य करून सर्वेक्षणासाठी रक्त्त देण्याचे आवाहन या तीनही संस्थानी केले आहे.
नागरिकांच्या रक्ताचे नमुने घेऊन त्यात कोरोना विरोधक प्रतिपिंडे (अँटिबॉडी) आहेत की नाही याचा शोध घेतला जाणार आहे. या सर्वेक्षणात शास्त्रीय पद्धतीने नागरिकांची निवड करण्यात येणार आहे. तसेच नमुने घेब्यास प्रशिक्षित स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे रक्त देताना नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांची योग्य व खरी उत्तरे द्यावीत असे आवाहन करण्यात आले आहे. फक्त कोरोनाच्या प्रसाराचे सांख्यिक विश्लेषण करणे व भविष्यातील उपाययोजनांचे नियोजन करणे हा याचा मुख्य हेतू आहे.
या संशोधनामुळे शहरांमध्ये कोरोनाचा प्रसार, त्याविरुद्ध आपोआप तयार झालेली प्रतिपिंडे, कोणत्या भागात आणि कोणत्या वयोगटात याचे प्रमाण काय आहे याचा अंदाज येणार असल्याचा दावा या संस्थानीं केला आहे. या माहितीमुळे शहरातील कोरोनाच्या संक्रमणाचे व्यवस्थापन भविष्यात कसे करावे याचा अंदाज लावण्यास मदत मिळणार आहे.