Corona virus : पुण्यात कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची 'बोगस'गिरी; कोरोना संसर्गाची साखळी तुटणार कशी?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2020 11:44 AM2020-09-08T11:44:23+5:302020-09-08T11:45:02+5:30

कमी मनुष्यबळाबळाबाबत तातडीने उपाययोजना हव्यात 

Corona virus: 'bogus' of contact tracing in Pune; How to break the chain of corona infection? | Corona virus : पुण्यात कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची 'बोगस'गिरी; कोरोना संसर्गाची साखळी तुटणार कशी?

Corona virus : पुण्यात कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची 'बोगस'गिरी; कोरोना संसर्गाची साखळी तुटणार कशी?

Next
ठळक मुद्देखाजगी प्रयोगशाळांमध्ये चाचण्या केल्यास कॉन्टॅक्ट ट्रेसिंगला होतोय विलंब

पुणे

घटना १ : हांडेवाडी येथील सहा जणांचे कुटुंब...मुलगा कॅब ड्रायव्हर. ३१ आॅगस्ट रोजी त्याला कोरोनाची लागण झाली. ३ सप्टेंबरपर्यंत महानगरपालिकेकडून कोणत्याही प्रकारचा फोन आला नाही किंवा कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी कोणीही घरी आले नाही. ४ सप्टेंबरला आई, वडील, मुलगा, पत्नी, भाऊ आणि भावजय अशा सर्वांची खाजगी प्रयोगशाळेत चाचणी करण्यात आली. त्यामध्ये आई, वडील आणि मुलगा पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाले. 

घटना २ : उत्तमनगर येथील एका कुटुंबामध्ये एक ३५ वर्षीय महिला प्रायव्हेट लॅबमध्ये चाचणी केल्यावर ३ सप्टेंबर रोजी कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले. दुस-या दिवशी पती आणि मुलीची चाचणी केल्यावर ती निगेटिव्ह आली. ७ सप्टेंबरपर्यंत महापालिकेकडून या कुटुंबाशी कोणत्याही प्रकारचा संपर्क साधण्यात आला नाही.

----------------
कोरोनाबाधित व्यक्तीचे निदान झाल्यानंतर त्यांच्या संपर्कातील १३ ते १५ व्यक्तींचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केले जात असल्याचा दावा महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून केला जात आहे. मात्र, प्रत्यक्षात एखाद्या कुटुंबात रुग्ण सापडल्यावर त्याच्या कुटुंबातील व्यक्तींशीही चाचणीसाठी महापालिकेकडून संपर्क साधला जात नाही. त्यामुळे कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे आकडे फसवे ठरत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जास्तीत जास्त चाचण्या, लवकर निदान, संपर्कातील व्यक्ती शोधणे, त्यांच्या चाचण्या आणि विलगीकरण ही प्रक्रिया वेळेत होणे आवश्यक असते. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी महापालिकेतर्फे ७५० टीम कार्यरत असल्याचे सांगितले जात आहे. सुरुवातीला ट्रेसिंगवर भर दिला जात होता. मात्र, शहरात आता एका दिवसात १५०० ते २००० रुग्ण सापडत आहेत. कोरोनाच्या अनपेक्षित संकटामुळे उपलब्ध मनुष्यबळावर ताण येत असल्याचे कारण पुढे केले जात आहे. मात्र, या अडचणींवर तातडीने उपाययोजना कधी केल्या जाणार, हा प्रश्न अनुत्तरितच राहत आहे.
-----------------------
खाजगी प्रयोगशाळांमध्ये चाचण्या केल्यास कॉन्टॅक्ट ट्रेसिंगला होतोय विलंब

खाजगी प्रयोगशाळांमध्ये कोरोनाची चाचणी झाल्यास ते अहवाल सुरुवातीला स्मार्ट सिटीकडे जातात. त्यानंतर क्षेत्रीय कार्यालयांनुसार रुग्णांची यादी केली जाते आणि ती महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे पाठवली जाते. आरोग्य विभागाकडून ती यादी क्षेत्रीय कार्यालयांकडे जाते. क्षेत्रीय कार्यालये संबंधित कुटुंबाशी संपर्क साधतात. त्यामुळे कॉन्टॅक्ट ट्रेसिंगला विलंब होत आहे.
---------------------------
पुणे शहरात एका कोरोनाबाधित व्यक्तीमागे १३-१५ जणांची चाचणी केली जाते. खाजगी लॅबमधील टेस्टचे रिपोर्ट स्मार्ट सिटीकडे जातात. तिथून क्षेत्रीय कार्यालयानुसार यादी तयार करून महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे दिली जाते. उपलब्ध मनुष्यबळावर कामाचा ताण आहे. हाय रिस्कमध्ये ५ तर लो रिस्कमध्ये १० जणांची चाचणी केली जात आहे.
-  डॉ. वैशाली जाधव, सहायक आरोग्य प्रमुख 
------------------
खाजगी प्रयोगशाळांमधील अहवाल थेट क्षेत्रीय कार्यालयांकडे यावेत, अशी मागणी आम्ही केली होती. मात्र, अहवाल केंद्रीय पध्दतीने आधी एकत्र होऊन मग क्षेत्रीय कार्यालयांकडे पाठवले जातात. खाजगी प्रयोगशाळेकडून विलंब झाल्यास संपर्क करण्यासही विलंब होतो.
- संतोष वारुळे, सहायक आयुक्त, वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय
--------------
कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आकडेवारी 

(३ सप्टेंबरपर्यंत - सौजन्य : स्मार्ट सिटी)

एकूण कॉन्टॅक्ट ट्रेसिंग : ११,८८,६६३
हाय रिस्क कॉन्टॅक्ट : ३,३४,१९२
लो रिस्क कॉन्टॅक्ट : ८,५४,४७१
सरासरी : १४.१७
कार्यरत टीम : ४७६

Web Title: Corona virus: 'bogus' of contact tracing in Pune; How to break the chain of corona infection?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.