Corona virus Pune Breaking: तब्बल ५१ टक्के पुणेकरांना होऊन गेला कोरोना! पण कळलाच नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2020 07:00 PM2020-08-17T19:00:41+5:302020-08-17T19:11:33+5:30
पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण सापडलेल्या पाच प्रभागांतील नागरिकांच्या शरीरातील अॅँटिबॉडीची तपासणी करण्यात आली.
पुणे : तब्बल ५१ टक्के पुणेकरांमध्ये कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी अॅँटिबॉडी विकसित झाल्या असल्याचे पुणे महापालिकेने केलेल्या सिरो सर्व्हेमध्ये दिसून आले आहे. येरवडा, कसबा पेठ-सोमवार पेठ, रास्ता पेठ-रविवार पेठ, लोहियानगर-कासेवाडी आणि नवी पेठ-पर्वती या पाच प्रभागांत प्रातिनिधिक स्वरूपात हा सर्व्हे करण्यात आला.
विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सोमवारी ही माहिती दिली. पुणे महापालिका, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ सायन्स एज्युकेशन अॅँड रिसर्च आणि ट्रान्सलेशनल हेल्थ सायन्सेस अॅँड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट यांच्या वतीने हा सर्व्हे करण्यात आला.
पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण सापडलेल्या पाच प्रभागांतील नागरिकांच्या शरीरातील अॅँटिबॉडीची तपासणी करण्यात आली. त्यासाठी त्यांच्या रक्ताची तपासणी केली गेली. सर्व्हेनुसार या प्रभागांतील ५१ टक्के लोकांमध्ये कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी अॅँटिबॉडी तयार झाल्या आहेत. याचा अर्थ त्यांना यापूर्वीच कोरोनाची बाधा झाली असून, त्यांनी त्यावर यशस्वीपणे मात केली आहे.
लोहियानगर-कासेवाडी प्रभागात सर्वाधिक लोकांमध्ये अॅँटिबॉडी
पुण्यातील लोहियानगर-कासेवाडी प्रभागात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण सापडले होते. याच प्रभागातील सर्वाधिक जणांनी कोरोनावर मात केली. सिरो सर्व्हेनुसार या भागातील तब्बल ६५.४ टक्के नागरिकांमध्ये कोरोनाविरुद्ध लढण्याच्या अॅँटिबॉडी दिसल्या आहेत. याचा अर्थ त्यांना कोरोना होऊन गेला असून त्यांनी त्यावर मात केली आहे.
प्रभागाचे नाव एकूण नमुने अॅँटिबॉडी टक्केवारी
येरवडा। ३६७ ५६.६
कसबा-सोमवार पेठ ३५२ ३६.१
रास्ता पेठ- रविवार पेठ। ३३५ ६५.४
नवी पेठ-पर्वती। २९८ ५६.७
एकूण १६६४ ५१.५
पुन्हा होऊ शकते कोरोनाची बाधा
या पाच प्रभागांतील सरासरी ५१ टक्के नागरिकांना कोरोना होऊन गेल्याचे दर्शविणाºया अॅँटिबॉडी सापडल्या असल्या तरी याचा अर्थ त्यांना पुन्हा कोरोनाची बाधा होणार नाही, असेही नाही.
............
काय आहे सिरो सर्व्हे?
सिरो सर्व्हेमध्ये व्यक्तीच्या शरीरातील रक्ताचे नमुने घेऊन अॅँटिबॉडीची तपासणी केली जाते. जर एखादी व्यक्ती कोरोनाबाधित होऊन गेली असेल तर त्याच्या शरीरात या अॅँटिबॉडी मिळतात. त्याप्रमाणे पुण्यातील पाच प्रभागांतील ५१ टक्के लोकांमध्ये या अॅँटिबॉडी आढळल्या आहेत. याचा अर्थ त्यांना यापूर्वी कोरोना होऊन गेला असू शकतो.