Corona Virus : कोरोनाच्या चिंताजनक परिस्थितीतही पुण्यामध्ये होतोय 'प्लाझ्मा'चा बाजार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2020 11:44 AM2020-08-11T11:44:53+5:302020-08-11T11:46:25+5:30
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने अतिगंभीर नसलेल्या ऑक्सिजनवरील रुग्णांना प्लाझ्मा देण्यासाठी मान्यता दिलेली आहे.
राजानंद मोरे
पुणे : कोरोनाबाधित रुग्णांना ‘प्लाझ्मा’ची मागणी वाढत असली तरी अद्याप त्याचे दर निश्चित करण्यात आलेले नाही. त्यामुळे संबंधित रक्तपेढीकडून स्वत:हून दर निश्चित करत विक्री केली जात आहे. सुमारे ९०० ते ११ हजार रुपये यादरम्यान २०० मिली प्लाझ्मा बॅगची विक्री होत आहे. दरम्यान, रक्तातून प्लाझ्मा वेगळा काढण्यासाठी आवश्यक चाचण्या, मशिन व कीटचा खर्च गृहित धरून दर निश्चित केल्याचे रक्तपेढ्यांकडून सांगितले जात आहे.
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने अतिगंभीर नसलेल्या ऑक्सिजनवरील रुग्णांना प्लाझ्मा देण्यासाठी मान्यता दिलेली आहे. पुण्यात ससून रुग्णालय व यशवंतराव चव्हाण स्मृति रुग्णालयांसह चार खासगी रुग्णालयांतील रक्तपेढ्यांमध्ये प्लाझ्मा दिला जात आहे. या रक्तपेढ्यांमध्ये दरांबाबत चौकशी केल्यानंतर वेगवेगळे दर समोर आले. ससून रुग्णालयातून प्लाझ्माची अन्य रुग्णालयांना विक्री केली जात नाही. केवळ ससूनमधील रुग्णांसाठीच मोफत प्लाझ्मा दिला जातो. तर ‘वायसीएम’मध्ये मागील आठवड्यापर्यंत खासगी रुग्णालयांनाही मोफत प्लाझ्मा बॅग दिली जात होती. मात्र, खर्च वाढू लागल्याने आता प्रति १०० मिली बॅगसाठी अडीच हजार रुपये व २०० मिली बॅगसाठी पाच हजार रुपये दर असल्याचे रक्तपेढीतून सांगण्यात आले.
एका खासगी रुग्णालयाच्या रक्तपेढीमध्ये २०० मिली बॅगचा दर ११ हजार रुपये एवढा सांगण्यात आला. तर पुण्यातील दोन मोठ्या रुग्णालयांच्या रक्तपेढीमध्ये हा दर अनुक्रमे ६३१० व ६१४० रुपये एवढा आहे. एका खासगी रक्तपेढीमध्ये मात्र केवळ ९०० रुपये दर असल्याचे स्पष्ट करण्यात आले. दोन रुग्णालये वगळता इतर रक्तपेढ्यांच्या दरामध्ये मोठी तफावत आढळून येते.
-----------
रक्तपेढ्या म्हणतात...
प्लाझ्मा दान प्रक्रियेमध्ये रक्ताच्या विविध चाचण्या कराव्या लागतात. तसेच शरीरातून रक्त काढून त्यातून प्लाझ्मा वेगळा करणे, पुन्हा ते रक्त शरीरात परत पाठविणे या प्रक्रियेसाठी प्रत्येकवेळी वेगळे कीट वापरले जाते. या सर्व प्रक्रियेसाठीचा खर्च जवळपास तेवढा होतो. त्यामुळे हे दर तेवढे असल्याचे दोन रक्तपेढ्यांकडून सांगण्यात आले.
-----------
प्लाझ्मा वेगळा काढण्यासाठी रक्तपेढ्यांचा खर्च तेवढा येतो, हे खरे आहे. पण तरीही शासनाने दर निश्चित करायला हवेत. आताची गरज ओळखून रक्तपेढ्यांना प्लाझ्मासाठी अनुदान दिल्यास गरीबांनाही कमी दरात प्लाझ्मा उपलब्ध होईल. तसेच आणखी रक्तपेढ्यांना मान्यता द्यायला हवी.
- राम बांगड, रक्ताचे नाते संस्था
--------------
प्लाझ्माचे दर निश्चित नसल्याने प्रत्येक रक्तपेढी आपला दर ठरवित आहे. हे दर ठरविण्याबाबत राज्य रक्त संक्रमण परिषदेकडे पाठपुरावा केला जात आहे. याबाबत चर्चाही सुरू असून लवकरच दर ठरतील, अशी अपेक्षा आहे.
- डॉ. अतुल कुलकर्णी, संचालक, जणकल्याण रक्तपेढी
--------------------
शहरातील काही रक्तपेढ्यांमधील प्लाझ्मा पिशवीचे दर
१. ससून रुग्णालय - विक्री नाही
२. यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय - १०० मिली - २५०० रुपये
२०० मिली - ५००० रुपये
३. खासगी रक्तपेढी - २०० मिली - ११ हजार रुपये
४. खासगी रक्तपेढी - १०० - ३००० रुपये
२०० मिली - ६१४० रुपये
५. खासगी रक्तपेढी - २०० मिली - ६३१० रुपये
६. खासगी रक्तपेढी - २०० मिली - ९०० रुपये
------'