Corona virus : पुणे महापालिकाच कोरोना 'हॉट स्पॉट' ठरण्याची शक्यता; काही नगरसेवकांसह तब्बल १०८ कर्मचारी बाधित
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2020 09:24 PM2020-06-19T21:24:24+5:302020-06-19T21:27:37+5:30
विविध कामांसाठी पालिकेत शेकडो नागरिक येत असल्याने पालिकेत संसर्गाचा धोका वाढला..
पुणे : महापालिकेची इमारत भविष्यात 'हॉट स्पॉट' ठरण्याची भीती असून पालिकेत सदैव वावर असलेल्या काही नगरसेवकांसह त्यांच्या जवळच्या नातलगांनाही कोरोनाची लागण झाली आहे. यासोबतच पालिकेचे तब्बल १०८ अधिकारी-कर्मचारी बाधित झालेले आहेत. यासोबतच विविध कामांसाठी पालिकेत शेकडो नागरिक येत असल्याने पालिकेत संसर्गाचा धोका वाढला आहे.
गेल्या काही दिवसात पालिकेतील दोन नगरसेवकांना कोरोनाची लागण झाली असून त्यांच्या निकटच्या संपर्कातील तीन नातेवाईक बाधित झाले आहेत. यामध्ये दोन महिला पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. नगरसेवक आपापल्या प्रभागात कोरोना काळात काम करीत आहेत. सॅनिटायझर, आर्सेनिक अल्बमच्या गोळ्यांचे वाटप करण्यापासून ते रेशन किट वाटप, नागरिकांना लागणारी मदत देण्याकरिता नगरसेवक काम करीत आहेत. त्यांचा अनेकांशी जवळून संपर्क येतो. त्यातच पालिकेमध्ये कामाकरिता येणे त्यांना क्रमप्राप्त आहे. कोरोनाची लागण झालेल्या एका महिला पदाधिकाऱयांचे दालन सील करण्यात आले असून त्यांच्या संपर्कात आलेल्या आणि त्यांच्या कक्षात बसणाऱ्या कर्मचार्यांसह कार्यकर्त्यांची तपासणी केली जाणार आहे. तर, दुसऱ्या एका महिला पदाधिकाऱ्यांच्या पतीला कोरोनाची लागण झाली होती. यासोबतच एक महिला नगरसेविका आणि त्यांचे पती, तसेच एका नगरसेविकेच्या पतीलाही लागण झाली आहे. तर, एका नगरसेवकाच्या मुलालाही लागण झाली होती.
यासोबतच शहराची स्वच्छता आणि अत्यावश्यक सेवा देणारे पालिका कर्मचारीही बाधित होत आहेत. पालिकेचे आतापर्यंत १०८ अधिकारी-कर्मचारी बाधित झाले असून, त्यात १० जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना बाधितांमध्ये सफाई कर्मचाऱ्यांची संख्या सर्वाधिक म्हणजे ४४ आहे. कोरोनामध्येही पालिकेचे कर्मचारी आणि अधिकारी जीवाची पर्वा न करता काम करीत आहेत. वैद्यकीय कर्मचार्यांव्यतिरिक्त, सफाई सेवक, बिगारी, सुरक्षा रक्षक, समूह संघटिका, मुकादाम, बहुद्देशीय कामगार, फिटर, आया आपले कर्तव्य बजावीत आहेत. यातील १०८ जणांना कोरोनाची बाधा झाली असून ५३ जणांना यशस्वी उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. तर ४५ जणांवर उपचार सुरू आहेत.
----/-/---
प्रत्येक अधिकाऱ्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या कक्षाबाहेर पालिकेत सॅनिटायझर ठेवण्यात आले आहे. यासोबतच दालनातील खुर्च्या कमी करून त्यामध्ये सुरक्षित अंतर ठेवण्यात आले आहे. जेणेकरून कमीत कमी लोक दालनात येतील आणि जे येतील त्यांच्यामध्ये सुरक्षित अंतर राहील.