Corona virus : दिलासादायक ! पुणे शहरातला कोरोना पॉझिटिव्हिटीचा दर ३० वरून १४ टक्क्यांवर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2020 08:04 PM2020-10-17T20:04:21+5:302020-10-17T20:05:13+5:30
पाच आठवड्यांपूर्वी तीस टक्के असलेली रुग्ण दरवाढीची टक्केवारी १४ टक्क्यांवर आली आहे. ही सकारात्मक बाब..
पुणे : शहरातील कोरोना रुग्णांची संख्या घटत असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला असून गेल्या पाच आठवड्यात रुग्ण दरवाढीची टक्केवारी खाली आली आहे. पाच आठवड्यांपूर्वी तीस टक्के असलेली रुग्ण दरवाढीची टक्केवारी १४ टक्क्यांवर आली आहे. ही सकारात्मक बाब असली तरी दुसरीकडे तपासण्यांची संख्याही कमी केलेली आहे. तपासण्यांच्या संख्येच्या तुलनेत पॉझिटिव्ह येणारी रुग्ण संख्या घटल्याचे दिसत आहे.
शहरात ९ मार्च रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. त्यानंतर शहरातील कोरोना रुग्ण वाढीचा वेग वाढला. शहरातील रुग्णसंख्या जिथे दिवसाला ५० असायची ती थेट दोन हजार पर्यंत जाऊन पोहोचली. त्यामुळे शहरात खाटांचा तुटवडा निर्माण झाला. ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरच्या खाटा उपलब्ध होत नव्हत्या. यासोबतच नागरिकांना खासगी रुग्णालयांकडून नडण्याचे प्रकारही घडत होते.
त्यामुळे प्रशासनावर मोठा ताण आला होता. शासनाच्या मदतीने महापालिका पीएमआरडी आणि जिल्हा प्रशासनाने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर जम्बो कोविड हॉस्पिटल सुरू केले. त्यानंतर, महापालिकेचे बाणेर डेडिकेटेड रुग्णालय सुरू झाले. या काळात विविध स्तरावर केलेल्या उपाययोजनांमुळे तसेच घरोघरी सर्वेक्षण व रुग्णांची लवकर होत असलेली तपासणी आणि वेळेत मिळत असलेले उपचार आदी उपाययोजनांमुळे रुग्ण लवकर निष्पन्न करणे आणि त्याच्यावर उपचार करून त्यांच्या संपर्कातील व्यक्तींना तात्काळ शोधून काढणे सोपे झाले. यामुळे रुग्ण संख्या घटल्याचे दिसून येत आहे.
गेल्या पाच आठवड्यामध्ये रुग्ण दरवाढीची टक्केवारी घटत गेल्याचे दिसते आहे. ३० टक्के असलेली ही रुग्ण दरवाढ ट्प्याटप्प्याने कमी होत आता १४ टक्क्यांवर आली आहे. ही बाब सकारात्मक असून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य केल्यास आणि योग्य ती खबरदारी घेतल्यास कोरोनाला रोखणे शक्य होईल असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. रुग्ण दरवाढीचा टक्केवारी कमी झालेली असली तरी धोका टळलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी बाळगणे क्रमप्राप्त आहे. परंतु तूर्तास तरी नागरिक आणि प्रशासन दोघांनाही काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.