Corona virus : पुणे शहरातील गोखलेनगर, जनवाडी आणि वडारवाडीत पुढील तीन दिवस पूर्ण संचारबंदी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 03:36 PM2020-06-16T15:36:19+5:302020-06-16T15:52:53+5:30
कोरोनाचा वाढता प्रादुर्भावाला अटकाव घालण्यासाठी निर्णय
पुणे : कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन ही साखळी तोडण्यासाठी गोखलेनगर, जनवाडी, वडारवाडी परिसरात बुधवारपासून पुढील ३ दिवस संपूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या काळात केवळ वैद्यकीय दुकाने वगळता किराणा दुकानांपासून सर्व दुकाने बंद करण्यात येणार आहे.
याबाबत सहायक आयुक्त किशोरी शिंदे यांनी आदेश काढला आहे. किशोरी शिंदे यांनी सांगितले की, जनवाडी, जनता वसाहत, गोखलेनगर, वडारवाडी भागात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अस असतानाही नागरिक कोणतीही काळजी न घेता विनाकारण मोठ्या प्रमाणावर बाहेर फिरताना दिसत आहेत. त्यामुळे ही साखळी तोडण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
याबाबत जनवाडी पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक समीर चव्हाण यांनी सांगितले की, या संपूर्ण परिसरात दररोज कोरोना बाधितांच्या संख्येत मोठ्या संख्येने वाढ होत आहे. तरीही त्याचा नागरिकांवर काहीही परिणाम होत नाही. त्यामुळे महापालिकेच्या आदेशानुसार या परिसरात पुढील तीन दिवस संपूर्ण संचारबंदी करण्यात आली आहे. तशी माहिती संपूर्ण परिसरात पोलीस व्हॅनवरुन देण्यात आली आहे. या भागातील दुकाने दुपारी २ पर्यंत उघडी ठेवली जात होती. नागरिकांना आवश्यक खरेदी करता यावी, म्हणून मंगळवारी ही दुकाने सायंकाळपर्यंत उघडी ठेवण्यास परवानगी दिली आहे. केवळ दुध विक्री करणार्यांनाच या तीन दिवसात सकाळी २ तास दुध विक्रीची परवानगी देण्यात येणार आहे. त्यांनी यावेळेत फक्त दुध विक्री करावी़ कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत सध्या ३१८ अॅक्टिव्ह कोरोना बाधित रुग्ण आहेत. त्यात गेल्या काही दिवसात वडारवाडी १३०, जनवाडी ७५, हेल्थ कॅम्प, पांडवनगर ६६, गोखलेनगर ४१, रामोशीवाडी २१ रुग्ण आहेत. त्यापैकी काही बरे झाले असले तरी गोखलेनगर, जनवाडी भागातून दररोज १० ते १२ तसेच हेल्थ कॅम्प पांडवनगर, वडारवाडी भागातून १० नवीन रुग्ण आढळून येत आहे.