Corona virus : पुण्यातील कोरोना बाधितांच्या 'कॉन्टॅक्ट ट्रेसिंग' चा प्रशासनावर ‘स्ट्रेस’
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2020 03:03 PM2020-07-18T15:03:17+5:302020-07-18T15:04:13+5:30
दिवसागणिक कोरोना बाधितांची संख्या हजारच्या पुढे गेल्याने कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर मर्यादा..
पुणे : कोरोनाबाधित व्यक्तीमुळे इतरांना संसर्ग होऊ नये, यासाठी बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना विलग करणे आवश्यक असते. शहरात संसर्ग सुरू झाल्यानंतर रुग्णसंख्या कमी असल्याने प्रत्येक बाधिताच्या संपर्कातील सर्वांचा शोध घेतला जात होता. पण आता रुग्णांचा आकडा हजाराच्या पुढे गेल्याने ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’ला मर्यादा आल्या आहेत. बाधित व्यक्तीच्या घरातील व लक्षणे असलेल्या व्यक्तींच्या तपासणीवरच अधिक भर दिला जात आहे.
शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेले कुटूंबीय व कॅबचालक तसेच त्याच्या संपर्कात आलेल्या आरटीओमधील एका कर्मचाºयाचीही चाचणी घेण्यात आली होती. तेव्हापासून कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर दिला जात आहे. दिवसागणिक रुग्णसंख्या वाढू लागल्याने संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्याचा ताणही वाढू लागला. आरोग्य विभागासह पोलिस यंत्रणेचीही मदत घेण्यात येत आहे. पण मागील काही दिवसांत रुग्णांचा आकडा हजाराच्या घरात जात असल्याने संपर्कातील प्रत्येक व्यक्तीचा शोध घेणे यंत्रणेला कठीण जात आहे. मनुष्यबळाअभावी यंत्रणेवरील ताण वाढू लागला आहे. परिणामी सध्या कुटूंबातील व हाय रिस्क गटातील लोकांनाच शोधून तपासणी केली जात आहे.
----------------
रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढत चालल्याने कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी मनुष्यबळ अपुरे पडू लागले आहे. त्यामुळे यंत्रणेवरील ताण वाढला आहे. तरीही बाधित व्यक्तीचे कुटूंब, आजुबाजूचे तसेच त्याच्या थेट संपर्कातील व्यक्तीचा शोध घेतला जात आहे. त्यातील लक्षणे असलेल्या व हाय रिस्क गटातील व्यक्तींची चाचणी केली जाते. इतरांना क्वारंटाईनच्या सुचना दिल्या जातात.
- वैशाली जाधव, सहायक आरोग्य अधिकारी, महापालिका
-------------
कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करताना प्रशासनाकडून प्रथम संपर्कात आलेल्या व्यक्तींमध्येच सर्वाधिक बाधित रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये १ लाख १४ हजार जणांची तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी २४ हजार १२ जण बाधित आढळून आले असून एकुण बाधितांमध्ये हे प्रमाण ७८.६७ टक्के एवढे आहे. तसेच जनजागृतीमुळे स्वत: पुढे आलेल्या बाधित रुग्णांचे प्रमाण सुमारे १२ टक्के आहे. मोबाईल रुग्णावाहिकेतून ५ टक्के तर घरोघरी सर्वेक्षणातून सुमारे २ टक्के बाधित आढळून आले.
-----------------
असे होते ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’ (स्त्रोत - पुणे महापालिका)
एकुण तपासणी बाधित टक्केवारी
प्रथम संपर्क १,१४,३९१ २४०१२ ७८.६७
मो.रुग्णवाहिका १२५३८ १५६७ ५.१३
घरोघरी सर्वेक्षण ४८६४ ५६१ १.८४
फ्लु क्लिनिक ६०९६ १४८ ०.४८
परदेश प्रवासी ५९५२ ३८ ०.१२
पीएमपी कर्मचारी - २२६ ०.७४
अत्यावश्यक सेवा - ३४८ १.१४
स्वत: पुढे आलेले - ३६२३ ११.८७
-------------------------------------------------------