corona virus : ‘कंटन्मेंट झोन’ राहिले नावालाच : नागरिकांना नाही कुठलेय गांभीर्य ना प्रशासनही फिरकेना !
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2020 02:24 PM2020-07-06T14:24:07+5:302020-07-06T14:26:34+5:30
पत्रे, बॅरिकेटस् लावून सील केलेला विशिष्ट भाग पुढे 'कंटन्मेंट झोन' चे नियम व सूचनांचे पालन करतो की नाही याची शहानिशा अथवा त्यावर कुठेही नियंत्रण ठेवणारी यंत्रणाही सध्या कार्यरत नाही.
पुणे : कोरोनाबाधितांचा संख्या जास्त असलेला भाग सील करून तो 'कंटन्मेंट झोन' (प्रतिबंधित क्षेत्र) म्हणून जाहिर करण्याची प्रक्रिया महापालिका प्रशासनाने सुरू केली आहे. परंतु, या 'कंटन्मेंट झोन' चे गांभीर्यच लोकांच्या लक्षात येत नसून, येथे लावण्यात आलेले पत्रे, बॅरिकेटस् उचकटून नागरिकांची ये-जा सर्रास सुरू असल्याचे चित्र शहरामध्ये बहुतांशी ठिकाणी दिसून येत आहे.
मध्यवर्ती भागासह उपनगरात १ जुलैपासून नव्याने १०९ भाग कंटन्मेंट झोन म्हणून सील करण्याचे आदेश प्रशासने दिले. हे करीत असताना तेथील सहाय्यक आयुक्त दर्जाच्या अधिकाºयांची सनियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्तीही केली. तसेच नव्याने कोरोनाबाधित रूग्ण जास्त असलेले भाग सील करण्याचे अधिकारही दिले. त्यानुसार ही कार्यवाही सुरू होऊन कोरोनाबाधित रूग्ण असलेली इमारत, गृह निर्माण सोसायटी, चाळ, काही घरांची वस्ती असा मर्यादित भाग सील करण्यात येऊ लागला. मात्र, याची माहिती आसपासच्या नागरिकांना बहुतांशी ठिकाणी दिसून येत आहे.
पत्रे बॅरिकेटस् लावून सील केलेला विशिष्ट भाग पुढे 'कंटन्मेंट झोन' चे नियम व सूचनांचे पालन करतो की नाही याची शहानिशा अथवा त्यावर कुठेही नियंत्रण ठेवणारी यंत्रणाही सध्या कार्यरत नाही. परिणामी या भागातील नागरिकांची तसेच तेथे जाणाऱ्या नागरिकांची सर्रास ये-जा सुरू आह़े. 'कंटन्मेंट झोन' मध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या दुकांनांनाच विशिष्ट वेळेत परवानगी देण्यात आली आहे. मात्र या आदेशांची पायमल्ली होत असून, नागरिकही प्रशासनाच्या सूचनांकडे दुर्लक्ष करीत आहे.
घोळक्याने एकत्र येणे, गाड्या पार्क करून गप्पा मारणे, फिजिकल डिस्टसिंगचे पालन न करणे, मास्कचा वापर न करणे, कुठेही थुंकणे आदी प्रकार या भागात वारेमाप सुरू आहेत. यामुळे शहरातील हे सर्व 'कंटेन्मेंट झोन'नावालाच राहिले असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे.
-------------------------------------