Corona virus : पुण्याच्या अग्निशामक दलात कोरोनाचा शिरकाव; पन्नास वर्षीय जवानाला लागण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2020 03:58 PM2020-05-08T15:58:57+5:302020-05-08T16:16:46+5:30
जवान रुग्णालयात दाखल : सोबतच्या जवानांची होणार तपासणी
पुणे : शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता लढत असलेल्या योद्ध्यांना त्याची लागण होऊ लागलेली आहे. पालिका-पोलीस कर्मचाऱ्यांनंतर अग्निशामक दलाच्या जवानाला कोरोनाची लागण झाली आहे. अग्निशामक दलाच्या जवानाला लागण व्हायची ही पहिलीच घटना असून या जवानावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पालिकेच्या आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अग्निशामक दलाचा संबंधित कर्मचारी ५० वर्षांचा असून तो बंबावर चालक म्हणून काम करतो. पत्नी व मुलीसह दलाच्याच क्वॉर्टर्समध्ये राहण्यास आहे. या कर्मचाऱ्याला मागील आठवड्यात श्वास घेण्यात अडचण जाणवत होती. तसेच अंगदुखीचा त्रास जाणवू लागला होता. स्वतःची तपासणी करून घेत हा कर्मचारी सोमवारी दवाखान्यात दाखल झाला. त्याची स्वॅब टेस्ट करण्यात आली. त्याचा अहवाल गुरुवारी प्राप्त झाला. स्वॅब टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत.
हा कर्मचारी अन्य कोणाच्या संपर्कात आला होता का याचा शोध घेण्यात येत आहे. यासोबतच त्याने ज्या शिफ्टला काम केले आहे, त्या शिफ्टमधील जवानांची तपासणी केली जाणार आहे. यासोबतच त्यांनी ज्या ज्या ठिकाणी वर्दीला गाडी नेली होती त्या ठिकाणांचीही माहिती घेण्याचे काम सुरू करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
अग्निशामक दलात पहिला रुग्ण आढळून आल्याने आपत्कालीन व्यवस्थेतील आणखी एका यंत्रणेमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याचे समोर आले आहे. अन्य जवानांनी काळजी घेण्याचे तसेच सुरक्षा साधने वापरण्याचे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे