corona virus : देशात कोरोनाचा सर्वत्र गुणाकार, पिंपरीत मात्र वजाबाकी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2020 05:42 PM2020-03-30T17:42:57+5:302020-03-30T17:57:41+5:30
चारपैकी सोमवारी आणखी एकाचा अहवाल निगेटिव्ह आल्याने डिस्चार्ज
पिंपरी : कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्याच्या प्रभावी उपाययोजना महापालिकेने केल्या असून देशात सर्वत्र रूग्णांची संख्या वाढत असून पिंपरी-चिंचवड शहरात मात्र, गुणाकार होण्याऐवजी वजाबाकी होत आहे. वेळीच घेतलेली दक्षता आणि डॉक्टर, पोलीस, वैद्यकीय आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे रूग्णांची संख्या कमी होत आहे. बारापैकी उपचार घेत असलेल्या चारपैकी सोमवारी आणखी एकाचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्याला डिस्चार्ज दिला आहे. त्यामुळे रुग्णांची संख्या तीनवर आली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात कोरोनाचा प्रादूर्भाव वाढला आहे. महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय व भोसरी येथील नवीन रुग्णालयात कोरोनाच्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यासाठी आयसोलेशन कक्ष तयार केला आहे. महापालिकेचे प्रशासन, वैद्यकीय आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासन हे एकजूटीने काम करीत असल्याने गेल्या दहा दिवसात एकही नवीन रूग्ण आढळलेला नाही.
तपासणीत १९१ जणांचे अहवाल निगेटिव्ह
पुण्यातील एनआयव्हीमध्ये पिंपरी-चिंचवड शहरातील आजपर्यंत एकूण २२२ व्यक्तींचे घश्यातील द्रव्याचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते. त्यापैकी १९१ जणांचे अहवाल प्राप्त झाले असून १९१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर बारापैकी तीन जणांवर उपचार करून सोडून देण्यात आल्याने रूग्णालयात सध्या नऊ जण उपचार घेत आहेत. काल दाखल केलेल्या १८ जणांचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडले आहे.
२१ जणांचे अहवाल प्रतीक्षेत
महापालिकेच्या रूग्णालयात २१ जणांना दाखल केले असून त्यांच्या घश्यातील द्रव्याचे नमुने पुण्यातील एनआयव्हीमध्ये तपासणी करण्यासाठी पाठविले आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. तसेच १४ दिवसांचा होम क्वारंटाईन पूर्ण करणाºयांची संख्या दोनशे आहे. तसेच रविवारी सायंकाळी २१ जणांचे नमुने एनआयव्हिमध्ये तपासणीस पाठविले आहेत.
आता उरले तीनच रूग्ण
पिंपरी चिंचवड मध्ये पहिले तीन रुग्ण अकरा मार्चला आढळून आले होते. या तिघांनी पुण्यातील दुबईला गेलेल्या दाम्पत्याबरोबर प्रवास केला होतो. एकाच दिवशी तीन रुग्ण आढळल्याने शहरात खळबळ उडाली होती. उपचारानंतर त्यांना शुक्रवारी घरी सोडले होते. त्यानंता त्यांच्या संपर्कातील पाच जणांचे दोन तपासणी अहवाल शनिवारी रात्री प्राप्त झाले. त्यामुळे रविवारी सकाळी त्यांना घरी सोडले.
त्यानंतर आणखी एका रूग्णाचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. सोमवारी दुसऱ्यांचा त्याच्या घशातील द्रवाचे नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत. त्यामुळे हे अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर मंगळवारी सकाळी त्यास घरी सोडले जाणार आहे. त्यामुळे रुग्णाची संख्या घटून तीन होणार आहे. रूग्णाचा दुसरा अहवाल आल्यानंतरच त्यास घरी सोडले जाणार आहे.
१४२५ प्रवाशांना होम क्वारंटाईन
महापालिकेच्या वतीने परदेशातून आलेल्या प्रवाशी आणि त्यांच्या कुटुंबावर लक्ष ठेवले आहे. त्यासाठी सुमारे २४४ टीम तयार केल्या आहेत. आलेले प्रवाशी त्यांची ट्रॅॅव्हल हिस्ट्री तपासून त्यांना होम क्वारंटाईन केले आहे. होम क्वारंटाईनमध्ये असणाऱ्या नागरिकांवर प्रशासनाचे लक्ष आहे. सध्या १४२५ प्रवाशांना होम क्वारंटाईन केले आहे.
आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, लॉक डाऊनच्या कालखंडात नागरिकांनी घराबाहेर पडू नये. स्वतची आणि कुटुंबाची काळजी घ्यावी. नियमितपणे हँडवॉश करावा. सोशल डिस्टसिंग पाळायला हवे. हस्तांदोलन टाळावे, सर्दी, खोकला, ताप आदी लक्षणे आढळल्यास वैद्यकीय उपचार घ्यावेत. नागरिकांनी आपल्या, कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. एक जणांचा पहिला अहवाल निगेटिव्ह आला आहे. दुसरा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्या रूग्णास घरी सोडण्यात येणार आहे.