Corona virus : इंदापूरमध्ये कोरोनाचा उद्रेक, एकाच दिवशी आढळले १३ नवीन रूग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2020 06:02 PM2020-07-02T18:02:53+5:302020-07-02T18:14:43+5:30
इंदापूर शहरातील कोरोनाचा वाढता आलेख प्रशासन कसे रोखणार ? असा सवाल उभा राहिला आहे.
इंदापूर : इंदापूर तालुक्यासह शहरात कोरोना महारोगाने थैमान घातले आहे. कोरोनाचा प्रसार अतिशय वेगाने होत असून गुरुवारी ( दि. २ ) एकाच दिवसात तब्बल १३ रुग्णांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती तहसिलदार सोनाली मेटकरी यांनी दिली. यामध्ये इंदापूर शहरातील एकाच कुटुंबातील ५, तालुक्यातील शेळगाव येथील ५ व शेळगाव परिसरातील ३ असे एकूण १३ रुग्णांची एकाच दिवसात भर पडली आहे. बुधवार ( दि. १ ) जुलै रोजी इंदापूर शहरातील एका ५८ वर्षीय पुरुषाची आणि जंक्शन परिसरातील ३५ वर्षीय महिलेची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. तर ( दि. ३० ) जून रोजी इंदापूर तालुक्यातील शेळगाव येथील एका ३२ वर्षीय पुरुषाला कोरोनाची बाधा झाल्याचे तपासणीतुन उघड झाले. या सर्व रुग्णांच्या संपकार्तील तब्बल ३७ व्यक्तींच्या घशाचे नमुने ( स्वॅब ) घेण्यात आले. यापैकी एकूण १३ व्यक्तींची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने इंदापूर तालुक्यात एकच खळबळ माजली आहे.
इंदापूर शहरातील एकाच कुटूंबांतील ५ व्यक्तींची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आहे. तर शेळगाव मधील ३२ वर्षीय रुग्णाच्या संपकार्तील ५ व्यक्ती कोरोना बाधित झाल्याचे निष्पन्न झाले आहे. याशिवाय जंक्शन येथील ३५ वर्षीय महिलेच्या संपकार्तील ३ व्यक्तींची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा इंदापूर तालुक्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. दिवसोंदिवस इंदापूर तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. केवळ १२ दिवसात इंदापूर तालुक्यात एकूण १९ कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आल्याने इंदापूरकरांची काळजी अधिक वाढली आहे. कोरोनाचा वाढता आलेख प्रशासन कसे रोखणार ? असा सवाल उभा राहिला आहे. तालुक्यात दिवसेंदिवस मुंबई, पुणे, सोलापूर या हॉटस्पॉटमधून नागरिकांची ये-जा सुरू असल्याने प्रशासनसमोर खूप मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
इंदापूर तालुक्याची एकंदरीत परिस्थिती :-
- रुग्णांची एकूण संख्या - ३८
- मृत्यूमुखी पडलेले - २
- बरे होऊन घरी सोडलेले - १६
- पुणे येथे उपचार सुरू असलेले - ४
- मुंबई येथे उपचार सुरू असलेले - १
- बारामती येथे उपचार सुरू असलेले - १
- इंदापूर येथे उपचार सुरू असलेले - १४
-------------------------------