Corona virus : कोरोना पाॅझिटिव्ह महिलेने काढला पळ; पिंपरी-चिंचवड शहरातून पोहचली थेट दुबईला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2020 12:12 AM2020-07-21T00:12:12+5:302020-07-21T00:17:30+5:30
संबंधित महिला दुबई येथून काही कामानिमित्त पिंपरी - चिंचवड शहरात आली होती.
पिंपरी : कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने महिलेला होम क्वारंटाईन केले होते. मात्र संबंधित महिलेने पळ काढत थेट दुबई गाठले. पिंपरी-चिंचवड शहरातील पुनावळे येथे हा धक्कादायक प्रकार घडला.
डॉ. अमित आबासाहेब माने (वय ३३) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिलादुबई येथून काही कामानिमित्त पिंपरी - चिंचवड शहरात आली होती. दरम्यान कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्याने महिलेला परत दुबई येथे जाता आले नाही. पुनावळे येथील इंद्रमेघ या सोसायटीतील तिच्या फ्लॅटमध्ये महिला रहात होती. त्रास होऊ लागला म्हणून महिलेची ११ जुलै रोजी कोरोना चाचणी करण्यात आली. त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने महिलेला होमक्वारंटाईन करण्यात आले.
दरम्यान सदरची सोसायटीला प्रशासनाने प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले. त्यामुळे सोसायटीतील रहिवाशांना बाहेर पडण्यासाठी निर्बंध घालण्यात आले. असे असतानाही संबंधित महिलेने सोसायटीच्या सुरक्षा रक्षकाला चुकीचे नाव व चुकीचा फ्लॅट क्रमांक सांगितला. मेडिकलवर जाऊन येते, असे सुरक्षा रक्षकाला सांगून सोसायटीतून बाहेर पडली. मात्र परत न आल्याने तिचा शोध सुरू झाला.
दरम्यान, संबंधित महिलेने फिर्यादी यांच्या मोबाइलवर मेसेज केला. मी दुबईला पोहचली असून, शारजा विमानतळावर माझी कोविड चाचणी झाली. त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे, असे त्या मेसेजमध्ये नमूद केले आहे. असे असले तरी संबंधित महिला दुबई येथे पोहोचली कशी, त्यासाठी कोरोना चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट कुठून मिळविला, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.