Corona Virus : पुणे ग्रामीण भागातील कोरोनाबाधितांचा दर घटला; पण निर्बंध हटण्याची प्रतिक्षाच
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2021 10:21 PM2021-06-11T22:21:58+5:302021-06-11T22:22:54+5:30
पॉझिटिव्हीटी दर आला ९.७ टक्यांवर; हॉटस्पॉट गावांची संख्या ८६ वर
पुणे : ग्रामीण भागाचा रुग्णबाधितांचा दर काही प्रमाण कमी झाला असला तरी निर्बंध उठण्याइतपत तो खाली न आल्याने अजूनही व्यवहार सुरळीत व्हायला ग्रामीण भागाला वाट पाहावी लागणार आहे. सध्या ग्रामीण भागाचा बाधित दर हा ९.७ टक्के इतका आहे. यामुळे तिसऱ्या स्तरावरील निर्बंध लागू आहेत. दुसऱ्या स्तरावर येण्यासाठी ५ टक्यांच्या आता बाधितांचा दर आणावा लागणार असल्याने जिल्हा प्रशासनाला आणखी कठोर उपाय योजना कराव्या लागणार आहेत.
ग्रामीण भागात हॉटस्पॉट गावांची संख्या ८६ आहेत.पुणे शहराचा बाधितांचा दर हा पाच टक्यांच्या खाली आला आहे. त्यामुळे शुक्रवारच्या आढावा बेठकीत शहरातील निर्बंध शिथिल करण्यात आले. मात्र, पुणे आणि पिंपरी शहरात मात्र बाधितांचा दर हा अजूनही आटाेक्यात न आल्याने निर्बंध हटण्यास ग्रामीण भागाला अजूनही वाट पाहावी लागणार आहे. गेल्या आठवड्यात ग्रामीण भागाचा बाधितांचा दर हा १२.७ टक्के होता. हा दर घटून तो ९.७ टक्यांवर आला आहे. हे दिलासादायक चित्र असले तरी निर्बंध हटण्यासाठी ५ टक्यांचा टप्पा गाठावा लागणार आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने तालुकानिहाय कोरोना चाचण्यांमध्ये वाढ केली आहे. तसे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहे.
जिल्ह्यात सद्यस्थितीत १० पेक्षा जास्त रुग्णसंख्या असलेल्या हॉटस्पॉट गावांची संख्या ८६ आहे. तर क्रियाशील कंटेन्मेंट झोनची संख्या ही ३ हजार ७६२ ऐवढी आहे. एकट्या हवेली तालुक्यात सर्वाधिक १ हजार ७२० कंटेन्मेंट झोन आहेत. तर ८ हजार २२८ क्रियाशील रुग्णांची संख्या ग्रामीण भागात आहे.
चार आठवड्यात हॉटस्पॉट गावांत घट
कोरोनाची दुसऱ्या लाटेत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घट होत आहे. एप्रिल महिन्यात ४६५ हॉटस्पॉट गावे ग्रामीण भागात होती. मे महिन्यात ही संख्या घटून ४२८ वर आली. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात यात मोठी घट होऊन ती १८६ ऐवढी होती. तर गेल्या आठवड्यात १०० च्या संख्येने हॉटस्पॉट गावांच्या संख्येत घट होऊन ती आता ८६ वर आली आहे.
आठवड्यात रुग्ण संख्या घटली
कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत नवीन कोरोना बाधित रुग्णसंख्येत २ हजार ३४७ ने घट झाली आहे. हॉटस्पॉट गावांमध्ये १०३ ने घट झाली आहे. कोरोना अंतर्गत ग्रामीण भागात एकूण १ हजार ६२६ इतके मनुष्यबळ कंत्राटी स्वरूपात भरती करण्यात आले आहेत.
लसीकरणावर भर
जिल्ह्यात लसीकरणाचा वेग वाढवण्यात आला आहे. आतापर्यंत ११ लाख ७२ हजार ४८५ जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. यात ४९ हजार ५४१ हेल्थ वर्कर्सना पहिला डोस तर २७ हजार ९०१ हेल्थ वर्कर्सना दुसरा डोस देण्यात आला आहे. ९१ हजार १७९ फ्रंटलाईल वर्कर्सना पहिला तर ४३ हजार ५६४ जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. ४५ वर्षावरील ७लाख ६४ हजार ४०९ नागरिकांना पहिला तर १ लाख ५५ हजार ५५२ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. १८ ते ४४ वयोगाटातील ३८ हजार ९४ जणांना पहिला तर २ हजार २४५ जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे.
चाचण्यांची संख्या वाढवली
ग्रामीण भागातील बाधितांचा दर कमी करण्यासाठी व्यापक स्तरावर उपाय योजना करण्यात आल्या आहेत. तालुक्यात चाचण्यांची संख्या वाढवण्यात आली आहे. हॉटस्पॉट गावांत निर्बंध कठीण करण्यात आले आहे. याचे चांगले परिणाम येत्या काही दिवसांत दिसतील. बाधितांचा दर कमी होत असून लवरच तो पाच टक्यांच्या खाली आणण्याचे आमचे प्रयत्न आहेत
.- आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी.
----