CoronaVirus : पुण्यात कोरोना बाधितांचा आकडा एक हजारावर, आतापर्यंत ६९ जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2020 09:35 PM2020-04-25T21:35:21+5:302020-04-25T22:30:13+5:30
CoronaVirus : आज आणखी १३ कोरोनाबाधित रूग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले असून, शहरातील एक हजार रूग्णांमागे १५९ रूग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत.
पुणे : पुणे शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा आज एक हजाराच्या पार गेला. शनिवारी नव्याने आढळून आलेल्या ९० रूग्णांमुळे पुणे शहरातील (पुणे महापालिका हद्दीतील) कोरोनाबाधितांची संख्या १ हजार ९० झाली आहे तर आज आणखी पाच जणांचा बळी कोरोनाने घेतला असून, शहरातील कोरोनाबाधित रूग्णांची एकूण मृत्यूची संख्या ६९ झाली आहे. दरम्यान, आज आणखी १३ कोरोनाबाधित रूग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले असून, शहरातील एक हजार रूग्णांमागे १५९ रूग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. एकूण कोरोनाबाधितांची संख्या पाहता बरे होण्याचे प्रमाण पुणे शहरात १४.८५ टक्के आहे व मृत्यूदर ६.४ टक्के आहे.
पुणे शहरातील कोरोनाबाधितांची संख्या सलग दोन दिवस शंभरच्या पुढेच वाढत असताना, ९ मार्च रोजी पहिला कोरोनाचा रूग्ण ज्या शहरात सापडला तेथे आज दीड महिन्यानंतर हाच आकडा एक हजाराच्या पुढे गेला आहे. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री आठपर्यंत ९० नवीन कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. यापैकी ७९ रूग्ण पालिकेच्या डॉ. नायडू हॉस्पिटलमध्ये व पालिकेने उभारलेल्या आयसोलेशन सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. तसेच खाजगी हॉस्पिटलमध्ये २ दोन दाखल झाले आहेत.
पुणे शहरातील कोरोनामुळे बळी गेलेल्यांची संख्या ६९ झाली आहे. आज मृत्यू झालेल्या चार रूग्णांपैकी भारती हॉस्पिटलमधील ४३ वर्षीय व्यक्ती वगळता अन्य चार रूग्ण हे ५० च्या पुढील आहेत. यामध्ये ससूनमधील ५५ वर्षीय महिलेचा व ७२ वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. तर एका ६० वर्षीय महिलेचा औंध जिल्हा रूग्णालयात व ६८ वर्षीय पुरूषाचा सह्याद्री हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला आहे.
सध्या पुणे शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये ४५ कोरोनाबाधित रूग्णांची प्रकृती गंभीर आहे. तर आज नायडू हॉस्पिटलमधील ६ जणांना, ससून हॉस्पिटलमधील एकास व खाजगी हॉस्पिटलमधील ६ जणांना उपचाराअंती कोरोनामुक्त म्हणून घरी सोडण्यात आले आहे.