Corona virus : 'कोरोना योद्धे' लढतायेत तुटपुंज्या वेतनावरच ; भत्ते, वैद्यकीय सवलतींपासूनही चार हात लांब
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2020 12:27 PM2020-05-25T12:27:51+5:302020-05-25T12:36:36+5:30
किमान वेतन, कायम करणे, वैद्यकीय सवलती याबाबत सातत्याने पाठपुरावा करूनही त्यांच्याकडे दुर्लक्ष
राजानंद मोरे-
पुणे : कोरोना विषाणुशी दोन हात करणारे डॉक्टर, परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आदी कर्मचाऱ्यांनाच किमान वेतनाशिवाय काम करावे लागत असल्याचे समोर आले आहे. पुणे महापालिकेत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत (एनयुएचएम) काम करणारे हे कोरोना योद्धे तुटपुंज्या वेतनावरच लढा देत आहेत. त्यांना भत्ते, वैद्यकीय सवलतींपासूनही चार हात लांब ठेवण्यात आले आहे. त्यातच नवीन भरती झालेल्या त्याच पदावरील कर्मचाऱ्यांना मात्र वाढीव वेतन दिले जात असल्याने असुरक्षिततेची भावना निर्माण होत असल्याची व्यथा काही कर्मचाऱ्यांनी मांडली.
कोरोनाबाधित रुग्णांची सेवा करणारे डॉक्टर, परिचारिकांसह सर्व आरोग्य सेवकांसाठी देशातील विविध राज्यांनी वेतनवाढीसह विविध सवलती जाहीर केल्या आहेत. राज्यातही काही महापालिकांनी 'एनयुएचएम' तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन तसेच सवलती देऊ केल्या आहेत. पुणे महापालिकेने मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप कर्मचारी करत आहेत. राज्यात मुंबई पाठोपाठ पुणे शहरात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यामुळे डॉक्टर, परिचारिका तसेच इतर कर्मचाऱ्यांचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे त्यांना साप्ताहिक सुट्टीशिवाय इतर सुट्टयाही दिल्या जात नाहीत. त्यातच त्यांना तुटपुंज्या वेतनावरच काम करावे लागत आहे. पालिकेत 'एनयुएचएम'अंतर्गत २०० हून अधिक आरोग्य कर्मचारी आहेत. त्यांना साधे किमान वेतनही मिळत नाही. इतर कायम कर्मचाऱ्यांप्रमाणे त्यांना भत्ते, वैद्यकीय सवलतीही मिळत नाहीत. कोरोना महामारीमध्ये या कर्मचाऱ्यांनाही संसर्गाचा धोका आहे. पण तरीही ते आपले कर्तव्य पार पाडत आहेत. किमान वेतन, कायम करणे, वैद्यकीय सवलती याबाबत सातत्याने पाठपुरावा करूनही त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे कर्मचाऱ्यांनी 'लोकमत'ला सांगितले.
--------------
स्थानिक स्वराज्य संस्थेतील कंत्राटी, अनियमित, मानधनावरील कर्मचाऱ्यांना किमान वेतन मिळायला हवे. ' एनयुएचएम'मधील कर्मचाऱ्यांसाठी २०१५ पासून आमचा पाठपुरावा सुरू आहे. राज्य शासन, कामगार मंत्री, कामगार आयुक्त, पालकमंत्री यांचे यासंदर्भातील आदेश आहेत. पण त्याची दखल घेतली जात नाही. सद्यस्थितीतही आरोग्य कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष केले जात असून त्यांची आर्थिक पिळवणुक सुरू आहे.
- दीपक कुलकर्णी, प्रदेश सरचिटणीस
भारतीय मजदुर संघ
--------------
नवीन कर्मचाऱ्यांना दुप्पट वेतन
‘एनयुएचएम’अंतर्गत काही वर्षांपासून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ८ ते १० हजार रुपयांपर्यंत वेतन मिळते. तर कोरोनाच्या पार्श्वभुमीवर नुकत्याच नव्याने घेण्यातलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्यापेक्षा जवळपास दुप्पट वेतन दिले जात आहे. माझे पाच वर्षात केवळ दोन हजार रुपयांनी वेतन वाढले आहे. आम्हाला कोणतेही वैद्यकीय संरक्षण नाही. कुटूंबियांचा वेठीस धरून काम करत आहोत. पालिका प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनही याची दखल घेतली जात नाही. केवळ वेतनवाढीचे प्रस्ताव दिले जात आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना पसरू लागली आहे.
- महिला आरोग्य कर्मचारी
----------------------
काही वर्षांपासून महापालिकेच्या सेवेत असलेले व सध्या कोरोना बाधितांची सेवा करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घ्यावे, वेतनवाढ, वैद्यकीय संरक्षण द्यावे, अशी मागणी महापौरांकडे केली होती. पण अद्याप त्यावर काहीच विचार झालेला नाही.
- एक डॉक्टर
------------
नवीन कर्मचाऱ्यांसाठी वाढीव रक्कम
पद सध्याच्या कर्मचाऱ्यांचे वेतन नवीन कर्मचाऱ्यांचे वेतन
परिचारिका ८,६४० १९,२५०
फार्मासिस्ट १०,००० १९,२५०
ऑपरेटर १०,००० १९,२५०
स्टाफ नर्स १२,००० १९,२५०
प्रयोगशाळा ८४०० १९,२५०
तंत्रज्ञ
सहायक ६,००० १६७५०
-------------------------------------------